कोल्हापूर : महाविकास आघाडीतील घटक पक्षात विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर, राधानगरी आणि शिरोळ या तीन मतदारसंघांवरून घमासान सुरू असल्याचे पाहायला मिळते. या तिन्ही मतदारसंघांवर काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून दावा केला जात आहे.त्यातही उत्तर व राधानगरी मतदारसंघात अदलाबदल झाली तरच योग्य तोडगा निघू शकतो.गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांतील जागा वाटपावर प्रदेश पातळीवर तिन्ही पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीतून चर्चा होत आहेत. विद्यमान आमदार ज्या पक्षाचे आहेत, त्यांच्या पक्षाला ती जागा सोडण्याचा एक कॉमन फार्म्युला स्वीकारला गेल्यामुळे काही जागांवरील गुंता आपोआपच सुटला आहे.
त्यामुळे कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, हातकणंगले, करवीर या चार मतदारसंघात काँग्रेसचे आमदार असल्यामुळे या जागा आपसूकच काँग्रेसकडे जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे कागल, चंदगड मतदारसंघ जाणार हेही स्पष्ट असले तरी इचलकरंजी मतदारसंघावरदेखील दावा केला आहे.
शिवसेना व काँग्रेस हे पक्ष राधानगरी, कोल्हापूर उत्तर व शिरोळ अशा तिन्ही मतदारसंघात आग्रही राहिल्याने या जागांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. कोल्हापूर उत्तर शिवसेनेला देऊन राधानगरी व शिरोळ हे मतदारसंघ काँग्रेस आपल्याकडे घेऊ शकते. असे झाले तर शाहूवाडी व कोल्हापूर उत्तर या दोन मतदारसंघावर शिवसेनेला समाधान मानावे लागणार आहे.
राधानगरी मतदारसंघ काँग्रेसने प्रतिष्ठेचा विषय केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत राधानगरी, भुदरगडमधून काँग्रेसवर मतांचा पाऊस पडला होता. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेच्या प्रकाश आबिटकर यांना चांगल्या पद्धतीने लढत देऊ आणि ही जागा जिंकू, असा विश्वास काँग्रेसला आहे. त्यामुळेच काँग्रेसने या जागेसाठी आग्रह धरला आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी अद्याप तरी आपलाही आग्रह कायम ठेवला आहे.
दोन दिवसांत घमासान संपणार
तीन जागेवरून सुरू असलेली घमासान येत्या दोन दिवसात संपेल आणि त्यातून सर्वमान्य तोडगा निघेल, अशी अपेक्षा मात्र तिन्ही पक्षातून व्यक्त केली जात आहे. कदाचित रविवारी उमेदवारांच्या नावांची घोषणा होऊ शकते.