राज्यात मागच्या पाच वर्षांमध्ये घडलेल्या घडामोडी पाहता यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागून आहे. विधानसभा निवडणुकांचं बिगूलही वाजलं आहे. 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल समोर येणार आहेत. निवडणुकांनंतर राज्यात नेमकं काय चित्र असेल याबद्दल रोज नवनवे अंदाज वर्तवले जात आहेत. अशातच 1995 च्या निकालाचीही जोरदार चर्चा चालू आहे कारण या निवडणुकीत निवडून आलेले अपक्ष उमेदवार…..! कारण या निवडणुकीत मुख्य प्रवाहातील पक्ष वगळता, इतर लहान पक्ष आणि अपक्ष असे तब्बल 59 उमेदवार निवडून आले होते.

अपक्षांनी कसं बदलेलं होते विधानसभेचं चित्र… 

1995 च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाही लहान पक्ष आणि अपक्षांचा बोलबोला राहणार असं चित्र सध्या महाराष्टात दिसतंय. 1995 सालच्या या निवडणुकीत काँग्रेसला 80, शिवसेनेला 73, भाजपाला 65 आणि जनता दलला 11 जागा मिळाल्या होत्या. तर दुसरीकडे तब्बल 45 अपक्ष उमेदवारांनी विजयाचा झेंडा फडकवला होता.याव्यतिरिक्त महाराष्ट्र विकास काँग्रेसचा 1, नाग विदर्भ आंदोलन समितीचा 1, समाजवादी पक्षाचे 3, सीपीआयचे 3 आणि पीजंट्स अँड वर्कर्स पार्टीचे 6 उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे मोठ्या पक्षांव्यतिरिक्त निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या तब्बल 59 पर्यंत पोहोचली होती.

अधिक वाचा  पुणे जिल्ह्यातील २५ पुलांची तातडीने दुरुस्ती गरजेची; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्ट्रकचलर ऑडिटमध्ये उघड

महाराष्ट्रात 2019 साली वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या आघाडीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं विधानसभा निवडणुक गणितच बिघडवलं होतं. एमआयएमने फक्त छत्रपती संभाजीनगरची 1 जागा लढवली होती, मात्र एमआयएमने वंचितच्या सर्व जागांवर प्रचारासाठी ताकद लावली होती. तेव्हा वंचितचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता, मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी उमेदवार पडण्यास या आघाडीला कारणीभूत धरलं जात होतं. 2024 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 19 सप्टेंबरला ‘परिवर्तन महाशक्तिची’ स्थापना झाली आहे संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी आणि अन्य काही लहान पक्षांना घेऊन तयार करण्यात आलेल्या या आघाडीने पूर्ण ताकदीने विधानसभा निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले आहेत. तसंच दुसरीकडे वंचित, एमआयएम आणि मनसेही या निवडणुकीत स्वतंत्र लढणार असल्याचं सध्या चित्र आहे. त्यामुळे मविआ आणि महायुतीसह या पक्षांचंही महत्व वाढलेलं आहे.

अधिक वाचा  मोसमी वाऱ्यांची आगेकूच; संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा मोसमी पावसाने व्यापला

1995 च्या निवडणुकीत अपक्ष आमदार कुणाला पाठिंबा देणार यावरुन वेगवेगळी समीकरणं तयार केली जात होती. मात्र, या सर्व आमदारांनी त्यावेळी शिवसेना-भाजप महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यावेळी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तसंच अनेक अपक्ष आमदारांनाही या सरकारमध्ये मानाचं पान मिळालं होतं. त्यामुळे महाराष्ट्रात यंदाही लहान पक्ष आणि अपक्ष उमेदवार महायुती आणि मविआचं भवितव्य ठरवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.