मुंबई दि. १४ (रामदास धो. गमरे) बौद्धजन पंचायत समिती शिवडी विभाग गटक्रमांक १३ अंतर्गत येणाऱ्या आदर्श शाखा क्र. २३८, ३१० यांच्या संयुक्त विद्यमाने ६८ व्या धर्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त बुद्धविहार भूमिपूजन उदघाटन सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण, शिवडी येथे आयोजित करण्यात आला होता. सदर बुद्धविहाराचे भूमिपूजन विभागातील कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले, सदर प्रसंगी दोन्ही शाखांचे मान्यवर पदाधिकारी, सभासद, महिला मंडळ, ममता गृहनिर्माण हौसिंग सोसायटीची कमिटी व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी शाखा अध्यक्ष रमेश मोरे यांनी कोळंबकर साहेबांनी विधानसभा क्षेत्रातील भीमज्योत चैत्यभूमी, दादर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण ते ममता सोसायटी इथवर आंबेडकरी विचारसरणीला अनुसरून केलेल्या कार्याचा आढावा घेऊन कालिदास कोळंबकर साहेबांचे आभार व्यक्त केले व सदर बुद्धविहाराच्या प्रकल्पास कोळंबकर साहेब सर्वतोपरी सहकार्य करतील असे त्यांनी आश्वासन दिले आहे असे नमूद केले, तद्नंतर शाखा अध्यक्ष गोपी मोरे आपले विचार व्यक्त करत असता “कालिदास कोळंबकर साहेबांच्या सोबत राहिल्याने त्यांच्या बऱ्याच कामाचा मी साक्षीदार आहे, बुद्धविहाराकरता कोळंबकर साहेब सर्वतोपरी मदत करतील सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी पुतळा उभारावा अशी विनंती करीत त्यांचे आभार मानले. ममता हौसिंग सोसायटीचे चिटणीस आणि माजी गटप्रमुख प्रकाश कासे यांनी देखील आपले विचार मांडून स्थानिक रहिवाशांचे प्रश्न कोळंबकर साहेबांच्या समोर मांडले तसेच विजयादशमीच्या शुभदिनानिमित आमदार कालिदास कोळंबकर, दोन्ही शाखा व त्यांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या, शिवडी विभाग गटक्रमांक १३ चे गटप्रतिनिधी राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी ६८ व्या धम्मचक्र अनुवर्तन दिनाचे महत्व विशद करून सम्राट अशोक विजयादशमी, दसरा व धम्मचक्र अनुवर्तन दिन असा त्रिवेणी योग आपण साध्य करीत भूमीपूजनाचा कार्यक्रम केला ते प्रेरणादायी आहे असे संबोधित करीत उपस्थित उपासक, उपासिका, मान्यवर, पाहुणे व कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर साहेब यांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.
कालिदास कोळंबकर साहेब आपल्या भाषणात बोलत असता “भीमज्योत, नायगाव बीडीडी चाळीचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी चाळ संकुलन, तोरणा गेट, वडाळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे होणारे अनावरण, विभागातील विविध बुद्धविहार, विभागातील विविध न्याय आणि विधीसंगत कामे यांचा आढावा घेत पुढील सर्व कामांस अशी गती देत सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन दिले सोबतच वडाळा कोरबा मिठागर येथे आठ फुटी चौथऱ्यावर आठ फुटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भव्य मूर्ती उभा करतोय त्याठिकाणी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले. सोबतच ममता सोसायटीच्या कमिटी आणि प्रकाश कसे यांनी मांडलेल्या कॉर्पस फंड आणि पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन दिले, तसेच ममता सोसायटी कूपनलिकेच्या शुभारंभाचा सोसायटी चेअरमन प्रमोद लोखंडे यांच्या शुभहस्ते नारळ वाढवून त्याकामास ही गती दिली, तसेच आज बुद्धविहाराचे भूमिपूजन झाले असून दिवाळीला आपण बांधकाम सुरू करू” असे जाहीर केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखेचे चिटणीस बाळकृष्ण जाधव व कमलाकर वाणी यांनी सुमधुर आवाजात करून उपस्थितांचे मन जिंकून घेतले तसेच रमाई महिला मंडळाने धार्मिक पूजाविधीची धुरा सांभाळत गोडवाणीने पूजाविधी पूर्ण केला. सदर कार्यक्रमास ममता सोसायटीची कमिटी, रहिवासी, दोन्ही शाखांचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते, महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थिती लावून सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडल्याबद्दल शाखा अध्यक्ष रमेश मोरे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.