लोकसभा निवडणुकीमध्ये हातामध्ये पक्ष आणि चिन्ह नवीन असताना सुद्धा केवळ पाच दशकांचा राजकीय अनुभव पणाला लावत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. महाविकास आघाडीमध्ये सर्वात कमी जागा वाट्याला घेऊनही सर्वाधिक स्ट्राईक रेट ठेवत 10 पैकी आठ जागा निवडून आणण्याचा करिष्मा शरद पवार यांनी करून दाखवला. त्यानंतर लगेचच त्यांनी विधानसभेसाठी महाराष्ट्र पिंजण्यास सुरुवात केली. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात गेलेल्या आमदारांविरोधात शरद पवार यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इतकेच नव्हे तर गेल्या महिनाभरात त्यांनी भाजपला सुद्धा हादरे देण्यास सुरुवात केली आहे. 3 सप्टेंबर रोजी कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ यांच्या विरोधात भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करून त्यांना मोठी संधी देण्याचे सुतोवाच केले.

हर्षवर्धन पाटील यांना गळाला लावलं

यानंतर आता अवघ्या एका महिन्यामध्येच पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा भाजपला शरद पवार यांनी हादरा देत माजी मंत्री आणि सहकारामधील मोठं नाव असलेल्या हर्षवर्धन पाटील यांना गळाला लावलं आहे. पाटील तुतारी फुंकणार असल्याची सुद्धा चर्चा रंगली होती. आता त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे तीस दिवसांमध्ये हर्षवर्धन पाटील आणि घाटगे यांना भाजपमधून खेचत तुतारी फुंकण्यास सांगितली आहे. त्यामुळे भाजपला पश्चिम महाराष्ट्रामध्ये हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे. भाजपकडून पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरमध्ये झालेल्या भाजपच्या मेळाव्यामध्ये आपण ठरवलं तर 70 टक्के आमदार पश्चिम महाराष्ट्रातून निवडून आणू शकतो, असा आत्मविश्वास व्यक्त केला होता. मात्र, पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला नेते राखताना दमछाक होत आहे.

अधिक वाचा  कोथरुड येथे शिवस्मारकास 351 पणत्यांची आरास करून दीपोस्तव साजरा; स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानचा उपक्रम

भाजपला सोडचिट्टी देण्यामागे मतदारसंघातील कारणे

हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिट्टी देण्यामागे मतदारसंघातील कारणे सर्वाधिक आहेत. यामध्ये जागावाटपानुसार विद्यमान आमदार आहेक त्याच पक्षाकडे ती जागा राहणार आहे. त्यामुळे इंदापूरमधून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्ता भरणे हेच अजित पवार गटाकडून उमेदवार असतील यात शंका नाही. त्यामुळे राजकीय भवितव्यासाठी हर्षवर्धन पाटील नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून नाराजी सातत्याने बोलून दाखवली होती. भाजपने आपल्या अनुभवाचा फायदा करून घेतला नाही असे सुद्धा त्यांनी म्हटले होते. त्यामुळे पाटील तुतारी फुंकणार हे जवळपास निश्चित झालं होतं. मात्र, त्यांनी पितृ पंधरवडा पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांकडून होणारा आग्रह आहे त्याला मान देत आपण निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं. आता त्यांनी निर्णय घेतला निर्णय घेतला आहे.

अधिक वाचा  ऐन विधानसभेत शिवसेना उद्धव ठाकरेंकडून तीन जिल्हाप्रमुखांची हकालपट्टी, कारण….

पुणे, कोल्हापूरनंतर सोलापुरात हादरा बसणार?

दुसरीकडे कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यामध्ये दोन नेते गळा लावल्यानंतर आता शरद पवारांचा मोर्चा सोलापूरकडे सुद्धा वळला आहे. सोलापूरमध्ये लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच विजयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला आव्हान देत खासदारकीची निवडणूक लढवली. त्यानंतर पुन्हा एकदा रणजीतसिंह मोहिते पाटील सुद्धा तुतारी हाती घेणार का? अशीच चर्चा रंगली आहे. पाटील सध्या भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत. मात्र. त्यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी माझी कोणतीही तडजोड करण्याची तयारी असल्याचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये केले होते. त्या कार्यक्रमासाठी शरद पवार देखील उपस्थित होते.

रणजीतसिंह मोहिते पाटील तुतारी फुंकणार? 

त्यामुळे रणजीतसिंह मोहिते पाटील सुद्धा आता महाविकास आघाडी सोबत जाणार का? अशीच चर्चा आहे. माढा विधानसभा मतदारसंघात अनेक इच्छुक असले तरी शरद पवार यांच्यासमोर विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे, अभिजीत पाटील आणि रणजीतसिंह मोहिते पाटील ही तीन प्रमुख नावे स्पर्धेत आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात आम्हाला अकलूज किंवा पंढरपूरचा आमदार नको आणि बबनराव शिंदे यांना पक्ष प्रवेश नको अशी भूमिका इतर इच्छुकांनी उघडपणे घेतली आहे. त्यामुळे शरद पवारांना याही गोष्टीचा विचार करावा लागणार आहे.

अधिक वाचा  कोथरूडमध्ये दादांच्या शिलेदाराची शक्तीप्रदर्शनात बाजी; बहुजनांचे हक्काचे शक्तीकेंद्र ‘ॲक्टिव्ह’; अचानक गणिते बदलली

माढामध्ये कोणाला संधी दिली जाणार?

माढा मतदारसंघात निर्णय ठरवण्याची ताकद ऊस उत्पादक शेतकरी वर्गात असल्याने शरद पवार यांच्यासमोर सध्या रणजित शिंदे आणि अभिजीत पाटील या दोघांमधील उमेदवार निवडणे हाच सर्वात मोठा पर्याय आहे. कोणताही उमेदवार निवडला तरी विधानसभेच्या प्रचारात यंदा जाहीर केलेला उसाचा दर हा सर्वात प्रमुख मुद्दा ठरणार आहे. अभिजीत पाटलांच्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील इतर मतदारसंघात इच्छुक असणाऱ्या साखर कारखानदार उमेदवारांनाही याच दराच्या जवळपास जावे लागणार आहे. अभिजीत पाटील यांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील सर्वच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपये मिळणार असून सोलापूर जिल्ह्याचा उसाचा दरही आता कोल्हापूरच्या स्पर्धेपर्यंत जाऊ शकणार आहे.