मुंबई: दि. १८ (रामदास गमरे) चैत्यभूमीचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष, बौद्धाचार्यांचे जनक सुर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचा ४७ वा स्मृतिदिन बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांच्या अध्यक्षतेखाली विभागातील सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाचे सरचिटणीस राजेश घाडगे यांनी सूत्रसंचालन व प्रस्ताविकाची धुरा सांभाळली, प्रास्ताविक सादर करीत असताना त्यांनी भैय्यासाहेबांच्या जीवनपटाचा आलेख मांडत, भैय्यासाहेबांचा स्मृतिदिन का साजरा केला जातो यावर मौलिक माहिती दिली तद्नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी अध्यक्षीय भाषणात “इसवीसन १९०४ साली बाबासाहेबांनी मुंबईत आगमन केलं सुरवातीला त्यांनी काही काळ डबक चाळ मध्ये घालवला परंतु मुलांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी तेथील वातावरण बरे नसल्याने ते बीआयटी चाळ १ मध्ये आले, भैय्यासाहेबांचा जन्म तिथेच झाला, लहानपणापासूनच त्यांना शिक्षण, संघटन, कौशल्य, नेतृत्व याचे बाळकडू मिळाले म्हणूनच बाबासाहेबांनंतर भारतीय बौद्ध महासभेच काम, अखंड भारतभर बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराच महत्कार्य त्यांनी गाडीघोडा नसल्याने अक्षरशः सायकलवर प्रवास करून पूर्ण केले, शुभ्र वस्त्र परिधान करून घरातून निघणारे भैय्यासाहेब संध्याकाळी येईस्तोवर त्यांचे कपडे धुळीने माखलेले असायचे, संपूर्ण भारतभ्रमण करून त्यांनी बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवला, बौद्धांचार्यांची संकल्पना राबवून स्वतः चिवर धारण करून श्रामनेर झाले व त्यातूनच पुढे अनेक नवीन बौद्धांचार्य त्यांनीं घडवले म्हणूनच त्यांना बौद्धांचार्यांचे जनक म्हटले जाते, तसेच महू ते चैत्यभूमी अशी पदयात्रा काढून त्यांनी चैत्यभूमीची निर्मिती केली, मंत्रालयासमोरील बाबासाहेबांचा पुतळा बसविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि १९५८ ला बौद्धजन पंचायत समितीचे भारतातील पहिले स्मारक सर्व सहकार्यांना घेऊन अत्यल्प निधीत उभारले, दिनदलितांसाठी सतत झटणारे, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ गतिमान करणारे भैय्यासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबांनंतर आंबेडकरी चळवळ पुढे नेली, वडिलांच्या नावाचा कधीही फायदा न घेणारे व स्वकर्तृत्वाने शून्यातून जग निर्माण करणारे भैय्यासाहेब हे सर्वांसाठी एक आदर्श आहेत, त्यांचाच वारसा आज मा. भीमराज आंबेडकर, मा. प्रकाश आंबेडकर, मा. आनंदराज आंबेडकर हे चालवत आहेत आपणही त्यात खारीचा वाटा म्हणून आंबेडकर परिवारासोबत उभे राहिले पाहिजे” असे प्रतिपादन केले.

अधिक वाचा  बारामतीसाठी पवारांचा नवा डाव! मुलाखतीला ‘युगेंद्र’ची दांडी उमेदवार? शरद पवारांची सावध भूमिका

सदर कार्यक्रमास संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार, चिटणीस मनोहर बा. मोरे, विभागीय गटप्रमुख व साहित्य, क्रीडा, कला समितीचे अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, व्यवस्थापक प्रदीप तांबे, कार्यालयीन सचिव संजय मोहिते, भाई जोशी, भगवान साळवी, जेष्ठ कार्यकर्ते वायंगणकर, मंगेश जाधव, दर्शन जाधव, विश्वस्त पवार, गोरेगाव विभागातील माजी अध्यक्ष कदम, निवडणूक मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जाधव तसेच शाखा क्र. ५७८, २८२, ३७१, ३७२, ४७६, ८४८ या सर्व शाखांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य, विभागीय चिटणीस आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते त्या सर्वांनीच भैय्यासाहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, सरतेशेवटी बौद्धजन पंचायत समितीचे सरचिटणीस राजेश घाडगे यांनी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.