काँग्रेसचे वरिष्ठ नेते, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याबाबत महायुतीकडून धक्कादायक विधानं समोर येत आहेत. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचं बक्षीस देऊ, असं खळबळजनक विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं. तर राहुल गांधी यांची जीभ छाटायला नको तर त्याला चटके द्यायला हवेत, असं विधान भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केलं. राहुल गांधी यांच्याबाबतच्या विधानांमुळे वाद निर्माण झाला आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून यावरच भाष्य करण्यात आलं आहे. मोदी यांनी विष पेरले, ते उगवले आहे!, असं सामनाच्या अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.

सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याची भाषा भाजपचे पुढारी व त्यांच्या गोतावळ्यातील लोक करतात. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा त्यावर बोलायला तयार नाहीत. म्हणजे या हिंसक वक्तव्यांना व गांधींवरील हल्ल्याचे कारस्थान रचणाऱ्यांना मोदी-शहांचा छुपा पाठिंबा आहे असे समजायचे काय? महाराष्ट्रात राहुल गांधींवर हिंसक हल्ल्याची भाषा होते. गांधींवर हल्ला करणाऱ्यांना इनाम देण्याची घोषणा करणाऱ्यांना गृहमंत्री फडणवीस संरक्षण देत असतील तर या राज्यात विरोधी पक्ष सुरक्षित नाही. मोदी यांनी विष पेरले, ते उगवले आहे!

अधिक वाचा  5 वर्ष सत्तेत मौजमस्ती करणं आणि देशाची संपत्ती विकूण श्रीमंत होणं हेच या लोकांचं काम, नाना पटोलेंचा प्रफुल्ल पटेलांवर हल्लाबोल

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत भाजप व त्यांच्या गोतावळ्याने केलेली वक्तव्ये भयंकर आहेत. नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत जे विष पेरले ते कसे उगवले आहे याचे चित्र मागच्या काही दिवसांत दिसले. आरक्षणासंदर्भात गांधी यांनी परदेशात केलेले विधान भाजपवाल्यांनी देशात मोडून तोडून समोर आणले. गांधी हे देशातील आरक्षण संपवायला निघाले आहेत व आम्ही ते होऊ देणार नाही, असे गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले. ‘फेक नरेटिव्ह’ निर्माण करण्याच्या कारखान्याचे मालक मोदी, शहा व फडणवीस असे लोक आहेत व त्यांनी गांधी हे आरक्षणविरोधी असल्याचा प्रचार सुरू केला. इथपर्यंत सर्व ठीक, पण आता भाजप व त्यांच्या लोकांनी गांधी यांच्या संदर्भात हिंसक वक्तव्ये करायला सुरुवात केली.

अधिक वाचा  शरद पवारानंतर ‘मातोश्री’चेही निष्कर्ष बदलले? उद्धव यांची मोठी घोषणा, ”पक्ष सोडून गेलेल्यांना दरवाजे उघडे, पण..”

राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस देऊ, अशी भाषा मिंधे गटाच्या एका आमदाराने केली, तर भाजपचे एक ‘बोंडे’ खासदार सांगतात, जीभ कापण्याची गरज नाही. जिभेला चटके देऊ. त्याच वेळी दिल्लीतील भाजपचे एक आमदार धमकी देतात की, राहुल यांची अवस्था त्यांच्या आजी इंदिरा गांधींसारखी करू. ही धमकी म्हणजे गांधी यांच्या जिवाशी खेळण्याचाच प्रकार आहे. इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती व राहुल गांधी यांनाही त्याच मार्गाने जावे लागेल, असे भाजपचे आमदार सांगतात. त्याच वेळी केंद्रातले रेल्वे राज्यमंत्री, उत्तर प्रदेश सरकारमधील एक मंत्री राहुल गांधींबाबत अभद्र आणि हिंसक वक्तव्ये करतात. हे चित्र बरे नाही.

अधिक वाचा  धडाधड निर्णय, खटाखट योजनांची घोषणा; पण निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार 10 मिनिटांत उठून गेले

भाजपचे मानसिक संतुलन कोलमडले आहे व वरपासून खालच्या स्तरापर्यंत या कोलमडलेल्या मनाची प्रचीती लोकांना रोज येत आहे. राहुल गांधी हे विरोधी पक्षाचे नेते आहेत व त्यांच्या पक्षाचे शंभर खासदार निवडून आले आहेत. सरकारच्या खोट्या व चुकीच्या गोष्टींची गय न करता त्यांनी मोदी सरकारला सळो की पळो करून सोडले आहे. विरोधी पक्षनेत्याचे हे कर्तव्यच आहे व भारतीय संविधानाने त्यांना हा अधिकार बहाल केला आहे. विरोधी पक्षनेते संविधानाने दिलेल्या अधिकाराचे पालन करीत आहेत. त्यामुळे चिडलेला भाजप त्यांची जीभ कापणार असेल तर या देशात इदी अमिनशाही सुरू आहे हे मान्य करावे लागेल.