आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नायडूंनी केलेल्या धक्कादायक दाव्यानुसार, तिरुपती येथील श्री वेंकटेश्वर मंदिरात तयार होणाऱ्या प्रसाद लाडूमध्ये तुपाऐवजी जनावरांची चरबी वापरण्यात आल्याचा आरोप आहे. हा प्रसाद भक्तांना दिला जातो आणि त्याला अत्यंत पवित्र मानले जाते. नायडू यांनी हा आरोप एनडीएच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत केला.

‘YSR सरकारने पवित्रतेला धक्का दिला’

चंद्राबाबू नायडू यांनी स्पष्ट केले की, “गेल्या पाच वर्षांत वायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमलाच्या पावित्र्याला कलंक लावला आहे. त्यांनी ‘अन्नदानम्’ (मोफत भोजन) च्या गुणवत्तेशी तडजोड केली असून, लाडूमध्ये तुपाऐवजी जनावरांची चरबी वापरली गेली. मात्र आता आम्ही शुद्ध तूप वापरत आहोत आणि मंदिराच्या पावित्रतेचे संरक्षण करत आहोत.”

अधिक वाचा  माता सीता यांच्यासोबत स्वतःची तुलना, वादाच्या भोवऱ्यात अडकली करीना, अनेकांमध्ये संताप

तिरुपती येथील श्री वेंकटेश्वर मंदिर हे तिरुमला तिरुपती देवस्थानम्स (TTD) अंतर्गत येते, आणि तिथल्या लाडू प्रसादाची मागणी खूप जास्त असते. नायडू यांच्या आरोपामुळे हिंदू समाजात संतापाची लाट उसळली आहे. त्यांनी YSR सरकारवर आरोप करत म्हटले की, त्याकाळात मंदिरातील विविध सेवांमध्येही भ्रष्टाचार झाला होता.

YSR काँग्रेसचा पलटवार

YSR काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार वाय.व्ही. सुब्बा रेड्डी यांनी या आरोपाला तीव्र शब्दात प्रतिवाद केला आहे. त्यांनी नायडूंवर पलटवार करत म्हटले, “चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमलाच्या पवित्रतेला धक्का दिला आहे आणि करोडो हिंदूंच्या श्रद्धेला धक्का पोहोचवला आहे. त्यांच्या या आरोपांमध्ये कोणताही तथ्य नाही. नायडू यांनी राजकीय फायद्यासाठी या स्तरापर्यंत जाऊन आरोप केले आहेत.”

अधिक वाचा  हरियाणा निकालानंतर संजय राऊतांचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले, आता भूमिका घ्या, स्वबळावर लढायचं असेल ते सुद्धा सांगा!

रेड्डींनी नायडूंवर निशाणा साधत म्हटले की, “तिरुमला लाडूच्या पवित्रतेवर असा आरोप करणारा व्यक्ती मंदिराच्या पवित्र भावनांचा अनादर करत आहे. आम्ही, आमचे कुटुंब, देवासमोर शपथ घेऊन सिद्ध करू शकतो की, आमच्या काळात कोणत्याही प्रकारची भ्रष्टाचार झाली नाही. चंद्राबाबू नायडूंनीही त्यांच्या कुटुंबासह शपथ घेण्यास तयार आहेत का?

Animals fat was used instead of ghee in Tirupati Laddu Prasadam – AP CM Chandrababu Naidu pic.twitter.com/C4V7pzIN1e

— Aryan (@chinchat09) September 19, 2024

राजकीय वादाला उधाण

या आरोप-प्रत्यारोपामुळे आंध्र प्रदेशच्या राजकारणात तणाव निर्माण झाला आहे. नायडूंनी लावलेला आरोप धार्मिक आणि राजकीय दोन्ही स्तरांवर गंभीर असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. हिंदू समाजातील अनेकांनी या आरोपाची चौकशी करण्याची मागणी केली आहे, तर काहींनी YSR काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर कारवाईची मागणी केली आहे.