पुणे अर्बन सेलच्या वतीने डेक्कन येथील गुडलक चौकात कलाकार कट्ट्यालगत शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ आंदोलन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी वाहनचालक यांची जनजागृती आणि या समस्येचे निराकरण न करणाऱ्या सत्ताधार्यांचा व प्रशासनाचा निषेध करण्यात आला. आजमितीस पुणे शहर हे देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक असून वाढती लोकसंख्या आणि खासगी वाहनांची वाढती संख्या यामुळे शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे काळाची गरज बनली असून प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी आज हे डोळ्यांत अंजन घालणारे आंदोलन करण्यात आले. यावेळी सिग्नलला थांबून खास पुणेरी पाट्या हातात घेऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

अधिक वाचा  मनोज जरांगेंना पत्र देऊन 9 दिवस उलटले तरी यासाठी परवानगी मिळेना, मराठा समाजही आक्रमक

आजमितीस ६० ते ६५ लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या आपल्या शहरातील एकूण RTO नोंदणीकृत वाहनांची संख्या ४४ लाख असून शहरात दरवर्षी सरासरी २ लाख वाहनांची भर पडत आहे. या व्यतिरिक्त शहरामधे दररोज हजारो वाहने इतर शहरामधुन ये-जा करित असतात. पुणे शहरातील रजिस्टर्ड वाहनांची अंदाजे संख्या दुचाकी ३५ लाख, कार ७.५ लाख, रिक्षा ८८ हजार, कॅब्स ३७ हजार अशी वाहन संख्या आहे. वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या पाहता शहरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी असणाऱ्या वाहतुक पोलीस बांधवांची संख्या अत्यंत नगण्य अर्थात ११०० आहे. यामुळे शहरातील वाहतुकीवर प्रचंड ताण येत असून नागरिकांची गैरसोय होत आहे.

अधिक वाचा  रतन टाटा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, ICU मध्ये उपचार सुरु

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये सुविधांचा अभाव व मर्यादित बस संख्येमुळे नागरिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करीत नाहीत. पुणे शहरातील अकार्यक्षम सिग्नल ट्रॅफिक यंत्रणा, सार्वजनिक पार्किंग स्टेशनची निर्मिती अत्यंत कमी प्रमाणात, वाढत्या वाहनानुसार व शहरीकरणाच्या विस्तारानुसार नवीन रस्त्यांची निर्मिती व अस्तित्वातल्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यास पुणे महानगरपालिकेची अकार्यक्षम यंत्रणा या काही महत्त्वाच्या गोष्टींमुळे वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

या अनुषंगाने सदर आंदोलन छेडण्यात आले असता महाराष्ट्र अर्बन सेलचे सरचिटनीस नितीन जाधव, पुणे अर्बन सेलचे शराध्यक्ष्य स्वप्नील दुधाने, पुणे अर्बन सेलचे सदस्य राहुल पोटे, नीता गलांडे, मदन वाणी, वसंतकुमार भाटिया, युसुफ शेख, प्रमोद शिंदे, सचिन यादव, महेश कनेरकर, अमित भगत, गणेश ठोंबरे, सुरज शिंदे, पृथ्वीराज बेलदरे,प्रियांका तांबे, मीनल धनवटे, मच्छिंद्र उत्तेकर, अद्वैत कोंढरे, अमित गोडांबे, पुष्कर भिलारे, ऋषिकेश मारणे तसेच अर्बन सेलचे सर्व पदाधिकारी आणि सहकारी उपस्थित होते.