राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत मोठा खुलासा केला होता. देवेंद्र फडणवीसांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सावध प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून गणेशोत्सवानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर एकनाथ खडसेंना खरंच राज्यपालपदाची संधी मिळणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी  घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. यावेळी पत्रकारांनी त्यांना एकनाथ खडसेंच्या वक्तव्याबाबत विचारले. त्यावर फडणवीस म्हणाले, एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले हे मी ऐकलेलं नाही. मात्र त्यांच्याबाबतीत आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्यच आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून गणेशोत्सवानंतर योग्य तो निर्णय केला जाईल.

अधिक वाचा  धडाधड निर्णय, खटाखट योजनांची घोषणा; पण निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार 10 मिनिटांत उठून गेले

फडणवीसांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ खडसेंबाबत कोणता निर्णय घेतला याची माहिती त्यांनी दिली नाही. त्यामुळे खडसेंना एखाद्या राज्याचे राज्यपाल करून अथवा अन्य काही पद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाणार का, अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. फडणवीसांच्या या वक्तव्यावर आता एकनाथ खडसे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

काय म्हणाले होते खडसे ?

मला एक दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी बोलावले होते. त्यावेळी आम्ही दोघेच होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, नाथाभाऊ तुमची मी राज्यपालपदासाठी शिफारस करतो, त्यावर मी त्यांना म्हणालो की, देवेंद्रजी खरं सांगा, यापूर्वी देखील तुम्ही मला अनेकदा सांगितलं की हे करणार, ते देणार ते काही झालं नाही त्यामुळे माझा विश्वास बसत नाही. तुम्ही मला राज्यपाल केले तर आनंदाची गोष्ट आहे, पण माझा विश्वास बसत नाही. त्यावर ते म्हणाले की, मी माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो हा देवेंद्र फडणवीसचा शब्द आहे. मात्र पुढे काय झालं मला माहिती नाही पण फडणवीसांनी मला आश्वासन दिले होते. असं एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ खडसे म्हणाले होते.