केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह काल मुंबई दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात सकाळी अजित पवार त्यांच्यासोबत दिसले नाहीत. त्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. अमित शाह दिल्लीला रवाना होताना अजित पवार यांनी शाहंची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली? त्या बद्दल आज अजित पवार यांनी मीडियाला माहिती दिली. “मी मुंबई विमानतळावर अमित शाह यांची भेट घेतली. अमित शाह मुंबईत गणपती दर्शनासाठी आले होते. राज्यात सध्या कापूस-सोयाबीनचा प्रश्न आहे. कांदा निर्यात बंदी होऊ द्यायची नाहीय. कांद्यातून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत असतील, तर ते कसे मिळतील हे पहायला पाहिजे. बरीच वर्ष एमएसपीचा दर ठरलेला नाही. एफआरपी चार-पाचवेळा वाढली हे विषय मी त्यांच्या कानावर घातले” असं अजित पवार म्हणाले.
महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार का? यावर अजित पवारांनी ‘असं काही होणार नाही या सर्व थापा आहेत’ हे स्पष्ट केलं. “सर्व 288 जागांवर महायुतीमध्ये कुठल्या पक्षाला किती जागा द्यायच्या हे ठरेल. बरचस ठरलय, अजून काही गोष्टी ठरायच्या बाकी आहेत” असं अजित पवार म्हणाले. “महायुतीच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. महायुती सरकारने जो विकास साध्य केलाय त्याची माहिती लोकांना द्यायचीय” असं अजित पवार म्हणाले.
विधान परिषदेच्या जागांबद्दल काय म्हणाले?
भाजपाने तुमचा फोटो गायब केला? या प्रश्नवार अजित पवार म्हणाले की, “मीच त्यांना सांगितलय की, माझा फोटो लावू नका. लाडकी बहिण योजना महायुती सरकारने आणली आहे. महायुतीमधील पक्ष या योजना आपल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहेत” असं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादीमध्ये विधान परिषदेच्या जागांवरुन महिला आघाडीत मतभेद झाले होते. त्यावर अजित पवार म्हणाले की, अजून कोणाचही नाव ठरलेलं नाही.
‘तिसरी-चौथी आघाडी होऊ शकते’
“तिसरी आघाडी पुढे आलीय. चौथी आघाडी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता काय झालय, सगळ्यांना आमदार व्हायचं आहे. तरुणांची पहिली संधी आहे, त्यामुळे त्यांना वाटत मी निवडून आलं पाहिजे. वयस्करांना वाटतं माझी शेवटची संधी आहे. सगळ्या वयोमानातल्या लोकांना आपण आमदार व्हावं असं वाटू लागलय. शेवटी संविधानाने घटनेने अधिकार दिला आहे. जनता-जर्नादन सर्वोपरि आहे” असं अजित पवार म्हणाले.