सरकारवर मी नाही तर जनता नाराज, सरकार जर आमच्या मागण्यांची दखल घेत नसेल तर निवडणुकीत त्यांना दखल घ्यावी लागेल, असा इशारा प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी वापरला जाणारा पैसा जनतेचा आहे. पण काही आमदारांना लाडकी बहीण योजनेसाठी वापरला जाणारा पैसा काहींना बाप-दादांच्या कमाईचा पैसा वाटतो, अशी टीका बच्चू कडू यांनी रवी राणांवर केला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. तसेच दिव्यांग अभियानाचा फक्त नावापुरता अध्यक्ष, दिव्यांगांसदर्भातले निर्णयही कळवले जात नाहीत अशी खंत देखील बच्चू कडूंनी व्यक्त केली.
बच्चू कडू म्हणाले, आम्हाला नावापुरता दिव्यांग कल्याण अभियानाचा अध्यक्ष केला आहे. जिल्ह्यात जा आणि तक्रारी घ्या एवढंच आमचं काम आहे. दिव्यांग मंत्रालयाचे काय निर्णय होतात हे आम्हाला कळवलं सुद्धा जात नाही. अनेक गोष्टींसाठी आम्हाला भांडावं लागतं आणि भांडून आम्ही ते करून घेतो. सरकारने जर आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर निवडणुकीतून आम्ही दखल दाखवून देऊ. मी नाराज नाही पण लोक या सरकारवर नाराज आहे.
अनाथांना विधवा महिलांना का बाजूला ठेवता? बच्चू कडूंचा सवाल
लाडकी बहीण योजनेवरून बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बच्चू कडू म्हणाले, तुम्ही लाडकी बहीण आणली 1500 रुपये देत आहे. दिव्यांगांचा महिना आता दीड हजार केला? अडचणीत असणाऱ्यांसाठी तुमचे हात समोर येत नाहीत. लाडकी बहीण योजना चांगली पण तुम्ही दिव्यांगांना का बाजूला ठेवता ? अनाथांना विधवा महिलांना का बाजूला ठेवता ? त्यांना तुम्ही लाडकी बहीण म्हणत नाही? विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा पगार मिळेल तेवढेच मिळणार, लाडकी बहिणीचा त्यांना फायदा होणार नाही.
लाडकी बहीण योजनेसाठी वापरला जाणारा पैसा काहींना बाप-दादांच्या कमाईचा पैसा वाटतो : बच्चू कडू
आमदार रवी राणांच्या वक्तव्यावर बच्चू कडू म्हणाले, काही आमदारांना असं वाटतंय की आपण खूप मेहनत केली, घरदार विकून जो पैसा मिळाला तो आपण या लाडक्या बहिणीसाठी लावला. जनतेचा पैसा आहे, सरकारी पैसा हा सगळा आहे. लोकं कर भरतात याचा विसर या लोकांना पडला आहे. यांना वाटतं आपल्या बाप दादाच्या कमाईतून ही योजना चालू आहे, हे चुकीचा आहे. सरकार हे लोकांसाठी असतं आणि जर लोकांसाठी सरकार नसेल तर आमचा रक्तातील दोष म्हणा किंवा चांगुलपणा म्हणा तो राहणारच आहे.