राज्यातील महाविकास आघाडी लवकरच फुटणार आहे. जागावाटपात त्यांनी बनवाबनवी करुन ही फूट रोखली तरी मतदानानंतर निकाला दिवशीच आघाडी फुटणार असल्याचा मोठा दावा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे.उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरुन भाजपने त्यांच्यावर टीका करण्याचा सिलसिला सुरुच ठेवला आहे. उद्धव ठाकरे दिल्लीला का गेले? असा प्रश्न महाराष्ट्र विचारतोय, त्यांच्या या दौऱ्यातून, राज्यातील, शेतकरी, विद्यार्थी आणि अतिवृष्टीबाधितांना काय मिळालं? असे अनेक प्रश्न उपस्थित करत आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा ठाकरेंना डिवचलं आहे.

माध्यमांशी संवाद साधताना शेलार म्हणाले, “उद्धव ठाकरे हे स्वार्थासाठी दिल्लीला गेले आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी ते तिथे गेलेत. मात्र, आमचा ठाकरेंना सवाल आहे की, तुम्हाला मुंबईचा वडापाव आवडतो की आता दिल्लीची नल्ली निहारी आवडू लागली आहे? मुंबई आणि महाराष्ट्राचं यांना काही देणेघेणं नाही, मी माझं कुटुंब माझी जबाबदारी इतकंच त्यांच्यासाठी सर्व आहे”, अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केला. तर महाविकास आघाडीमध्ये (MVA) विधानसभा निवडणुकीच्या प्रमुख चहऱ्यांवर वाद सुरु आहे. या संदर्भात बोलताना शेलार यांनी मोठा दावा केला. ते म्हणाले, “याबाबतीतही ठाकरेंना दिल्लीला जाऊन काही मिळालं नाही. मात्र माझा ठाम दावा आहे की, लवकरच महाविकास आघाडी फुटणार आहे. जागावाटपात त्यांनी बनवाबनवी करुन ही फुट रोखली तरी मतदानानंतर निकाला दिवशीच आघाडी फुटेल.”

अधिक वाचा  मराठा आंदोलक मनोज जरांगे सहाव्यांदा उपोषण; मागण्या मान्य होणार का? सरकारची ही भूमिका स्पष्ट

शिवाय इंडिया आघाडी आणि ठाकरे गटाकडून राज्यातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला. सलमान खुर्शीद यांच्यासारखे नेते वारंवार काहीतरी बोलत आहेत. त्यासाठी काही शहरी नक्षलवाद संघटना काम करत आहेत. काही दिवसांपासून विविध आंदोलन करत वेगळं चित्र निर्माण केलं जात आहे. राहुल आणि सोनिया गांधी विदेशात जाऊन देशातील संस्थांवर टीका करत आहेत.

राज्यातील वातावरणही बिघडविण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकणं हा त्याचाच भाग आहे. मात्र,अशी कामं केली तर त्याचा फटका उबाठा गटालाही बसेल. कोणत्याही नेत्याला अशा प्रकारे थांबवणं आम्हाला मान्य नाही. उद्या तुमच्या नेत्यांच्या ताफ्यासमोर लोक आले तर कोल्हेकुई करू नका, असा इशाराही त्यांनी ठाकरे गटाला दिला.