आगामी विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी अजित पवारगटाला पुन्हा एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी बाबाजानी दुर्राणी यांनी अजितदादांच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर इंदापूरमधील प्रवीण माने यांनीही अजित पवारांची साथ सोडली. आता माढ्याचे आमदार बबनदादा शिंदेही अजित पवारांची साथ सोडण्याची शक्यता आहे. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. बंद दाराआड त्यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेली बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदेही उपस्थित होते. बबनदादा शिंदे तुतारी हातात घेणार का? याची चर्चा सोलापूरच्या राजकारणात सुरु आहे.
अजित पवार गटाचे माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचा मुलगा रणजितसिह शिंदे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार आज पुण्यात आहेत, मोदी बागेत आज सकाळपासून शरद पवार हे कार्यकर्त्याच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यावेळी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी शिंदे पिता पुत्र पोहोचले. त्याचे व्हिडीओ आणि फोटो झपाट्यावे व्हायरल झाले आहेत. शिंदे अजित घड्याळ काढून तुतारी हातात घेणार का? याची चर्चा सोलापूरच्या राजकारणात सुरु झाली.
दादांनी पवारांची भेट का घेतली? –
लोकसभा निवडणुकीत माढ्यामधील मतदारांनी भाजपला नाकारत तुतारी हातात घेतली. बबनदादा शिंदे यांच्या मदतारसंघात शरद पवार यांच्या उमेदवाराला मोठी लीड मिळाली होती. त्यामुळे भाजपमधून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आगामी विधानसभा निवडणुकीआधी माढ्यातील राजकारण पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे. शरद पवार माढा मतदारसंघासाठी नव्या उमेदवाराच्या शोधात आहेत. त्यातच आता बबनदादांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. बबनदादा मुलाच्या उमदेवारीसाठी पवारांच्या भेटीला गेलेत का? बबनदादा शिंदे अजित पवारांची साथ सोडणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
माढ्यात तुतारीची कमाल –
माढा लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यातील तीन तालुक्यात धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठं मताधिक्य मिळालं होतं. मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या शिंदे बंधुंच्या बालेकिल्ल्यातच मोहिते पाटलांना आघाडी मिळाली. माढा आणि करमाळा तालुक्यात मोहिते पाटलांनी मोठं मताधिक्य मिळालं आहे. माढ्यात मोहिते पाटलांना 50000 हून अधिकचा लीड दिलं.