उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर करण्यात येत असलेले आरोप व मिटकरींवरील हल्ल्यासंदर्भात भाष्य करण्यास माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज नकार दिला. तर राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणुका मविआमध्ये राहूनच लढणार असल्याचे स्पष्ट केले. सोबतच येत्या नऊ ऑगस्टपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) शिवनेरी किल्ल्यातून शिवस्वराज्य यात्रा काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ज्या मतदारसंघातून यात्रा जाईल, त्या मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार देण्याची भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली.

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीसाठी अनिल देशमुख हे आज (ता. ३१ जुलै) अमरावतीला आले होते. बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, आमच्या पक्षाची ज्या विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याची इच्छा आहे, त्या मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रा जाणार असून तेथील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहे.

अधिक वाचा  वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती? कोर्टात धक्कादायक खुलासे, १० दिवसांच्या कोठडीची मागणी

 

त्याचप्रमाणे या यात्रेतून महायुती सरकारच्या कारभाराची माहितीही जनतेला देणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी (श. प.) किती मतदारसंघात उमेदवार देणार आहे, हे अद्याप स्पष्ट नसल्याचे नमूद करीत ते पुढे म्हणाले की, यात्रेदरम्यान होणाऱ्या चर्चेनंतर महाविकास आघाडीच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत किती जागा हव्यात ते स्पष्ट केले जाईल. तथापि ज्या मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रा जाणार आहे, ते मतदारसंघ आमच्या पक्षासाठी मागण्याची भूमिका पक्षाची असल्याचे ते म्हणाले.

 

त्या प्रश्नावर बगल व नकार

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी बगल दिली. त्याचप्रमाणे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातही हा त्या दोन पक्षातील वाद असल्याचे सांगत बोलण्यास नकार दिला. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीत महाविकासमध्ये कोण मोठा भाऊ राहील, यावर बोलताना त्यांनी आमच्यात सर्व समान आहे, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला माजी मंत्री रमेश बंग, जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत, शहराध्यक्ष हेमंत देशमुख, संगीता ठाकरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.