तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांना काँग्रेसने मोठा धक्का दिला आहे. बीआरएसच्या विधानपरिषदेच्या सहा आमदारांनी शुक्रवारी मध्यरात्री काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यापूर्वीच विधानसभेच्या सहा आमदारांनी काँग्रेसची साथ दिली आहे. काँग्रेसने केसीआर यांच्या पक्षात मोठी फुट पाडली आहे. विधानसभेसह आता विधानपरिषदेच्या आमदारांना फोडत केसीआर यांना धक्का दिला आहे. दोन दिवसांपुर्वीच केसीआर यांचे विश्वासू आणि त्यांच्या पक्षातील तिसऱ्या क्रमांकाचे नेते केशव राव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
केशव राव हे राज्यसभेचे खासदार होते. काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर त्यांनी खासदारकीही सोडली आहे. या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसची राज्यातील ताकद चांगलीच वाढली आहे. विधानपरिषदेत काँग्रेसचे संख्याबळ चारवरून दहावर पोहचले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंध रेड्डी दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर शुक्रवारी रात्री राज्यात परतले. त्यानंतर लगेच सहा आमदारांना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पक्षात प्रवेश देण्यात आला.
केसीआर यांचे विधानसभेतील संख्याबळही कमी झाले आहे. सहा आमदारांनी यापूर्वीच त्यांची साथ सोडली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत बीआरएसला 119 पैकी केवळ 39 जागा मिळाल्या होत्या. त्यातून सहा आमदार कमी झाल्याने हे संख्याबळ 33 पर्यंत खाली आले आहे. तर विधान परिषदेत 25 जागा होत्या. हा आकडा आता 19 वर आला आहे.
दरम्यान, बीआरएसचे नेते, आमदार केटी रामा राव यांनी आमदारांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस संविधानाची रक्षा करत असल्याचा दावा करत असेल तर बंडखोरी केलेल्या आमदारांनी पदाचा राजीनामा द्यायला हवा, असे त्यांनी म्हटले आहे.