आषाढ जसजसा जवळ येऊ लागतो, तसतसे वारकऱ्यांचे मन पांडुरंगाच्या ओढीने पंढरपुराकडे धाव घेऊ लागते. वारीचा प्रवासही शिस्तबद्ध. वारीची पालखी आळंदी ते पंढरपूर हा टप्पा पंधरा गावांना पार करत पूर्ण करते. पंढरपूर ही तर साक्षात पांडुरंगाची आणि संतांची भूमी. तसेच तिथे जाणारी वाट सुद्धा तेवढीच वैशिष्ट्यपूर्ण आहे. पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत. याबद्दल डॉ. संजय होनकळसे यांच्या ब्लॉगवरून व्हायरल झालेली माहिती निश्चितच वाचण्याजोगी आहे.
यंदाही पायी वारी झाली नाही, हरकत नाही तरीदेखील पुढे दिसलेल्या गावाच्या वाटेने आपली मनाची दिंडी पंढरपुरपर्यंत नेण्याचा हा प्रयत्न…..
पालखीचा प्रारंभ आत्मानंदातून
१) आळंदी – ज्येष्ठ वद्य नवमीला आळंदीतून पालखी निघते. आळंदी म्हणजे आत्मानंद. पालखीचा प्रारंभ आत्मानंदातून होतो.
पालखीबरोबर निघालो की पापे नष्ट होऊन पुण्यप्राप्ती
२) पुणे – पालखी पुण्यात येते. पालखीबरोबर निघालो की जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते. (भवानी पेठ, बुरडाच्या पुलाकडील पालखी विठोबा मंदिर, पुणे या ठिकाणी पालखीचा दोन दिवस मुक्काम असतो.
दिवेघाट संवत्सर ग्राम
३) दिवेघाट – नंतर पालखी संवत्सर ग्राम उर्फ सासवड या क्षेत्राकडे निघते. सासवडला जाताना दिवेघाटातून म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या अष्टांगयोगाच्या आचार दिव्यातून जावे लागते.
श्वासावर ताबा म्हणजे सासवड मुक्काम
४) सासवड – वड म्हणजे सप्तचक्र. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा व शून्यचक्र या सप्तचक्रांची जागृती ही जीवनाची गरज आहे व ती जागृती प्राणायामाने होते. प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण, श्वासावर ताबा म्हणजे सासवडचा मुक्काम व परमार्थाचा मार्ग सोपान होऊन सोपानदेवांच्या समाधीचे दर्शन घ्यावे.
५) जेजुरी – नंतर पालखी जेजुरीला येते. ज = जितेंद्र , जोरी = जास्त त्रास न घेणे. म्हणजेच जो जास्त त्रास न घेता इंद्रियांना जिंकतो तो आनंदी होतो.
६) वाल्ह्या – भर दुपारी वाल्ह्यात येते. येथे दुपारचा मुक्काम असतो. भर तारुण्यात माणसाने वाल्हे= कोमल, प्रेमळ, जिव्हाळासंपन्न झाले पाहिजे. (वाल्ह्यात वाल्मिकी ऋषींच्या समाधीचे दर्शन होते.)
७) लोणंद – त्यानंतर पालखी लोणंदला मुक्कामाला येते. लो = देणे, आनंद = परमसुख. श्रीविठ्ठल भक्तीसाठी घरदार सोडून आलेला वारकरी भक्तिरसाने परमानंदी होतो व तो आनंद इतरांना देतो.
८) तरडगाव – जर तू ब्रम्हानंदाचा आनंद घेतला नाहीस तर तुला जीवनात रडावे लागेल या सिध्दांताचे चिंतन करण्यासाठी पालखी तर + रड =तरडगावला येते.
ब्रम्ह हे पूर्ण सत्य बाकी सारे मिथ्या
९) फलटण – ब्रम्हसत्यं जगन्मिथ्या। म्हणजे ब्रम्ह हे पूर्ण सत्य आहे बाकी सारे जग फोलपटासारखे मिथ्या म्हणजे टाकाऊ आहे. हा अनुभव वारकऱ्यांना फलटणला आल्यावर येतो.
१०) बरड – संसारातील सुखदुःखादि द्वद्वापासून मुक्त होतो. त्याचे जीवनरुपी क्षेत्र वासनेचे तृणांकूर न फुटणारे बरड जमिनीसारखे होते.
नात्याचा मोहातून मुक्त
११) नातेपुते – नातेपुते या गावी इतर नात्याचा मोहातून मुक्त होऊन तो फक्त श्रीविठ्ठलाचा होतो.
ज्ञानाची साखळी त्याला विठ्ठलरूप
१२) माळशिरस – माळ = साखळी + शिरस = ज्ञान = माळशिरस. पायी चालल्याने शारीरिक मुखाने नामस्मरण केल्याने वाचिक विठ्ठलध्यासाने मानसिक तपाबरोबर कीर्तन – प्रवचनाच्या श्रवणाने ज्ञानाची साखळी त्याला विठ्ठलरूप करते.
१३) वेळापूर – त्यानंतर त्यांचा मुक्काम वेळापूरात होतो. क्षणभर सुद्धा वेळ वाया न घालविता विठ्ठलभजन केले पाहिजे हे ज्ञान होते.
१४) वाखरी – वाखरीच्या मुक्कामी त्याची वाणी प्रासादिक व वाचासिद्ध होऊन.
१५) पंढरपुर – नंतर तो पंढरपूर जाऊन पांडुरंगमय होतो.