लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला कर्नाटकात पहिला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना पोक्सो प्रकरणात अटक होऊ शकते, असे संकेत खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिले आहेत. कर्नाटकात लोकसभा निवडणुकीदरम्यान माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांच्या सेक्स स्कँडलचे गंभीर आरोप झाले होते. काही दिवसांपुर्वीच त्यांना सीआयडीने अटक केली आहे. त्यानंतर आता येडियुरप्पा यांच्यावर अटकेची टांगती तलवाल आहे.
कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी गुरूवारी याबाबत मोठे संकेत दिले आहे. ते म्हणाले, ‘येडियुरप्पा यांना पोक्सो प्रकरणात गरज असल्यास अटक केली जाईल. याबाबतचा निर्णय सीआयडी घेईल.’ माजी मुख्यमंत्र्यांविरोधात काही दिवसांपुर्वीच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप येडियुरप्पांवर आहे. मुलीच्या आईने याबाबत 14 मार्चला तक्रार दिली होती. त्यानुसार त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. सीआयडीच्या नोटिशीला त्यांनी यापुर्वीच उत्तर दिलं आहे.
येडियुरप्पा हे चौकशीसाठी 17 जूनला हजर राहणार असल्याचे त्यांनी सीआयडीला कळवले आहे. तसेच त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. हे आरोप आधारहीन असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पण परमेश्वर यांच्या विधानामुळे येडियुरप्पा यांना चौकशीला हजर झाल्यानंतर सीआयडीकडून अटक केली जाऊ शकते, या चर्चांना उधाण आले आहे.
येडियुरप्पा यांनी अनेकदा मुख्यमंत्रिपद भुषवले आहे. 2008 ते 2011, त्यानंतर मे 2018 मध्ये काही दिवसांसाठी, 2019 ते 2021 या काळात ते मुख्यमंत्री होते. 2021 मध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर बसवराव बोम्मई यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.