रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं पुन्हा एकदा आयपीएल चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंग झालं आहे. आयपीएलच्या 17 व्या मोसमातील रंगतदार झालेल्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुवर 4 विकेट्सने विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सने या विजयासह क्वालिफायर 1 मध्ये धडक दिली. आता राजस्थान रॉयल्स शुक्रवारी 24 मे रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध फायनलाठी क्वालिफायर 2 मध्ये भिडणार आहे. तर दुसऱ्या बाजूला या पराभवासह आरसीबीचं आव्हान संपुष्टात आलं. आरसीबीच्या या पराभवासह टीमचा दिग्गज विकेटकीपर बॅट्समन दिनेश कार्तिक यानेही आपल्या आयपीएल कारकीर्दीला रामराम केल्याचं अप्रत्यक्ष जाहीर केलंय. कार्तिकने निवृत्तीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र सामन्यानंतर कार्तिकने ज्या पद्धतीने हात उंचावत चाहत्यांना निरोप घेतला. त्यावरुन कार्तिकचा हा आयपीएलमधील अखेरचा सामना असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच कार्तिकला आरसीबीच्या सहकारी खेळाडूंनीही एका प्रकारे गार्ड ऑफ ऑनर दिला.
राजस्थानने टॉस जिंकून आरसीबीला बॅटिंगसाठी बोलावलं. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 172 धावा केल्या. त्यामुळे राजस्थानला विजयासाठी 173 धावांचं आव्हान मिळालं. आरसीबीने या धावांचा बचाव करताना सामना 19 व्या ओव्हरपर्यंत नेला. मात्र राजस्थानने हा सामना 4 विकेट्सच्या मोबदल्यात 19 व्या ओव्हरमध्ये जिंकला. कार्तिकने या सामन्यात 13 बॉलमध्ये 1 फोरसह 11 धावांची खेळी केली. कार्तिकने आऊट झाल्यानंतर मैदानातून बाहेर पडताना चाहत्यांचे आभार मानले. तसेच राजस्थानने सामना जिंकल्यानंतर कार्तिकने हातातील ग्लोव्हज काढून हात उंचावत चाहत्यांचे आभार मानले. यावेळेस विराट कोहलीने कार्तिकला घट्ट मीठी मारली. तसेच कार्तिके सर्वात पुढे मैदानातून बाहेर पडला. त्यावेळेस आरसीबीच्या सहकाऱ्यांनी कार्तिकचं टाळ्या वाजवून क्रिकेटच्या सेवेसाठी आभार मानले.
कार्तिककडून आधीच निवृत्तीबाबत प्रतिक्रिया
दरम्यान आयपीएलच्या 17 व्या हंगामातील दुसरा आणि आरसीबीचा पहिला सामना हा 23 मार्च रोजी चेपॉक स्टेडियमवर सीएसके विरुद्ध पार पडला. कार्तिकला या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत तुझा हा चेपॉकवर अखेरचा सामना आहे का? असा प्रश्न कार्तिकला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना कार्तिकने आशादायी उत्तर दिलं होतं. ” हा चांगला प्रश्न आहे. मला आशा आहे की प्लेऑफमधील सामना खेळण्यासाठी मी येथे येईन. प्लेऑफसाठी आम्ही पात्र ठरलो आणि चेपॉकमध्ये खेळायला आलो तर तो माझा अखेरचा सामना असेल. मात्र जर असं झालं नाही, तर मी चेपॉकवर माझा अखेरचा सामना खेळलोय”, असं कार्तिक म्हणाला होता. त्यामुळे एलिमिनेटरमधील पराभवानंतर कार्तिकला आपण आयपीएलमध्ये अखेरचं खेळताना पाहिलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
दिनेश कार्तिककडून चाहत्यांना निरोप, आरसीबीकडून अभिवादन
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज आणि लॉकी फर्ग्युसन.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन: यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकटेकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल.