कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार पी एन पाटील यांचे आज ( गुरूवार) पहाटे निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. पहाटे एका खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गांधी घराण्याच्या जवळचे म्हणूनही आमदार पी एन पाटील यांची ओळख होती. पाटील हे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक होते.

पी एन पाटील हे रविवारी बाथरूममध्ये पाय घसरून पडले आणि त्यांच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत झाली. त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली, आज पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

अधिक वाचा  मुख्यमंत्र्यांवर समाधानी नसून ते गुळगुळीत उत्तर देतात: हाके

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये पी. एन. पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी सडोेथेच च्यांली खालसा येथे नेण्यात येणार आहे. तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील असे समजते.

काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळख

करवीर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असलेले पी एन पाटील यांची कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळख होती. कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद सलग १८ वर्ष आमदार पाटील यांच्याकडे होतं. काँग्रेसच्या पडत्या काळात त्यांनी पक्षाला उर्जित अवस्था दिली. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यासह गांधी कुटुंबीयांशी त्यांचे निकटचे संबंध होते. पी एन पाटील हे गोकुळ दूध संघातील एक महत्त्वाचे नेते होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे कोल्हापूरसह राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे.

अधिक वाचा  सम्राट अशोक बुद्धविहार उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

सतेज पाटील यांनी व्यक्त केले दु:ख

काँग्रेसचे वरिष्ठ नेते सतेज पाटील यांनी पी एन पाटील यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. ‘ काँग्रेसचे निष्ठावंत,कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्यासारख्या निष्ठावंत नेत्याच्या निधनामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो व कुटुंबियांना दुःखातून सावरण्याचे बळ देवो.’ सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सतेज पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.