आयपीएलमध्ये आज कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर 60 वी मॅच होणार आहे. या लढतीत मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने सामने येणार आहेत. या मॅचपूर्वी रोहित शर्मा आणि कोलकाताचा सपोर्टिंग स्टाफ अभिषेक नायर यांच्यातील चर्चेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. खरंतर हा व्हिडीओ केकेआरनं पोस्ट केलाहोता. मात्र, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केकेआरनं त्यांची पोस्ट डिलीट केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर उपलब्ध असून यासंदर्भात दावे प्रतिदावे केले जात आहेत. रोहित शर्मा आणि अभिषेक नायरची चर्चा स्पष्टपणे समजत नसली तरी जेवढं समजतंय त्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे.
रोहित शर्मा आणि अभिषेक नायरमध्ये नेमकी काय चर्चा झाली?
रोहित शर्मा आणि अभिषेक नायर यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर केकेआरनं पोस्ट केला होता. यामध्ये मैदानावरील प्रेक्षकांचा गोंधळ देखील ऐकायला येत असल्यानं दोघांची चर्चा स्पष्टपणे समजत नाही. रोहित शर्मा म्हणतो,”एक-एक गोष्ट बदलत आहे, ते त्यांच्यावर आहे, जे पण आहे ते माझे घर आहे भावा, ते मंदिर आहे ना ते मी बनवलं आहे. भावा माझं काय, माझं तर हे शेवटचं”, असं रोहित शर्मा म्हणत असल्याचा दावा करण्यात येतो. काही जणांनी यावरुन ही मोठी बातमी असल्याचं म्हटलंय. रोहित शर्मा पुढील आयपीएल मुंबईकडून खेळणार का याबाबत देखील चर्चा सुरु झाल्या. काहींनी रोहित शर्मा पुढचं आयपीएल कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळेल का असा प्रश्न उपस्थित केला.