पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात शांततेत मतदान पार पडलेल्या महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला हिंसेचं गालबोट लागलं. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात एका मतदान केंद्रावर दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. वैयक्तिक कारणावरून वाद झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे, पण ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हत्या केल्याचा दावा केला. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात धाराशिव जिल्ह्यात मतदान झाले. भूम तालुक्यातील पाटसावंगी गावात दोन गटात वाद झाला. यात समाधान नानासाहेब पाटील (वय २७) याचा मृत्यू झाला.
मतदान केंद्राबाहेर वाद का झाला? पोलिसांनी काय सांगितले?
भूमचे उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांनी या घटनेबद्दलची माहिती दिली. दिलेल्या माहितीनुसार, पाटसांगवी गावात ही घटना घडली. जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्राबाहेर गौरव उर्फ लाल्या अप्पा नाईकनवरे (वय २३) आणि समाधान नानासाहेब पाटील (वय २७) आणि त्याचा एक मित्र असा तिघांमध्ये वाद झाला.
सकाळी ११.३० वाजता ही घटना घडली. गौरव उर्फ लाल्या आप्पा नाईकनवरे याने धारदार हत्याराने सदर दोघांना मारहाण करून जखमी केले. त्यानंतर त्वरित घटनास्थळावर पोलीस व पाटसांगवी गावातील नागरिक आले व त्यांनी सदर दोन्ही जखमींना औषध उपचारासाठी बार्शी जिल्हा सोलापूर येथे वाहनाने रवाना केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार समाधान पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिन्ही तरुणांमध्ये झालेल्या वादामागे वैयक्तिक कारण असल्याचे पोलीस अधिकारी हिरेमठ यांनी सांगितले.
शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी हत्या केल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेता सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसैनिकाची हत्या केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
“”लोकशाहीचा उत्सव चालू असतानाच धाराशिव, परांडामध्ये शिंदे गटाकडून आमच्या निष्ठावंत शिवसैनिकाचा बळी घेतला. खोक्यांच्या जिवावर मदमस्त झालेल्या तानाजी सावंतांच्या पोसलेल्या गुंडांकडून ही हत्या झाली. नापास गृहमंत्र्यांना निवडणूक प्रक्रिया तरी शांततेत पार पाडण्याइतके नियोजन जमेल का?”, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.
सांगोल्यात ईव्हीएम जाळले
सांगोला तालुक्यातील एक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशील जाळल्याची घटना घडली आहे. एका मतदाराने सोबत पेट्रोल आणले होते. ते मशीनवर ओतून पेटवून दिले. अधिकाऱ्यांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले. बादलवाडी येथे हा प्रकार घडला आहे.