नाशिक जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघातील माघारीकडे आज राज्याचे लक्ष लागले होते. या ठिकाणी महायुतीला “थोडी खुशी, थोडा गम…” अशी परिस्थिती निर्माण झाली. अनेक दिग्गजांची समजूत काढल्यानंतर काहींनी माघार घेतली. नाशिक आणि दिंडोरीमधील बंडखोर उमेदवारांनी माघार घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न झाले. नाशिकमध्ये भाजप नेते अनिल जाधव अगदी एक मिनिट बाकी असताना माघारीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहचले. पण पेच निर्माण झाला. या सर्व घडामोडीत नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

यांची उमेदवारी माघार
नाशिक लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) पदाधिकारी असलेले निवृत्ती अरिंगळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अजित पवार यांनी त्यांची फोनवरून समजून काढली. त्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतला. तसेच काल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या सेनेत प्रवेश करणारे विजय करंजकर यांनीही माघार घेतली आहे. भाजप नेते अनिल जाधव यांच्या माघारीसाठी शेवटच्या मिनिटाला पळापळ झाली. अवघा एक मिनिट शिल्लक असताना अनिल जाधव जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. वेळ कमी असल्याने जाधव यांच्यासह हेमंत गोडसे पळापळ करत पोहचले. परंतु माघारीबाबत पेच निर्माण झाला.

अधिक वाचा  पुणे शहर चिटणीसपदी अनिल सागरे तर संघटकपदी सचिन झगडे यांची नियुक्ती

दिंडोरीतही माघार
दिंडोरीमधून माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी माघार घेत भाजपला दिलासा दिला आहे. आता महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांची लढत सोपी होणार आहे. तसेच दिंडोरीमधून जे. पी. गावित यांनी माघार घेतली आहे. शरद पवार गटाला त्याचा फायदा होणार आहे. जे. पी. गावित यांनी माघार घेऊन दिंडोरी लोकसभेत महाविकस आघाडीला पाठिंबा दिला.

शांतिगिरी महाराज रिंगणात
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून इच्छूक असलेले शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले. कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, असे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यानुसार शेवटच्या दिवशी त्यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे त्याचा फटका आता महायुतीला बसणार आहे