बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत तिच्या निर्भिड वक्तव्यांसाठी, स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. मोठ्या पडद्यावर दमदार भूमिका करणारी कंगान आता एका नव्या क्षेत्रात उतरली अन् ते क्षेत्र आहे राजकारणाचं.. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत कंगना राणौत भाजपची उमेदवार आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी येथून तिला उमेदवारी मिळाली आहे. मंडीची लेक असलेली कंगना सध्या जोरदार प्रचारात व्यस्त आहे. या निवडणुकीत आपला विजय होईल, असा विश्वास तिला वाटतोय. एका मुलाखतीदरम्यान कंगनाने चित्रपट, लोकसभा निवडणूक आणि राजकारण याविषयी मत मांडले. त्याचवेळी कंगनाने तिच्या फिल्मी करिअरबाबत एक मोठी घोषणा केली. काय म्हणाली कंगना ?

राजकारणासाठी बॉलिवूडला राम-राम करणार कंगना ?

अधिक वाचा  मविआला मोठा धक्का! अजितदादांच्या करामती; महायुतीने मविआची मतं पळवली

ही लोकसभा निवडणूक जिंकल्यास मी हळूहळू शोबिझचे जग सोडू शकते, असे संकेत कंगनाने दिले. मला फक्त एकाच कामावर लक्ष केंद्रित करायला आवडेल, असे तिने स्पष्ट केले. चित्रपट आणि राजकारण कसे सांभाळेल ? असा प्रश्न कंगनाला विचारण्यात आला. ‘मी चित्रपटात अभिनयही करते, भूमिकाही करते आणि दिग्दर्शनही करते. निवडणुकीत जिंकले आणि राजकारणात येण्याची शक्यता दिसली तर मी राजकारणच करेन. खरंतर , मला एका वेळेला एकच गोष्ट करायला आवडेल, असे कंगनाने स्पष्टं केलं.

लोकांना माझी गरज आहे, असं मला वाटलं तर मी त्याच दिशेने पाऊल टाकेन. ( या निवडणुकी) जर मी मंडीतून विजयी झाले तर मग मी राजकारणच करेन. अनेक चित्रपट निर्माते मला सांगतात, की राजकारणात जाऊ नकोस. पण तुम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. माझ्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेमुळे लोकांना त्रास होत असेल तर ते योग्य नाही. मी एक प्रिव्हिलेज्ड आयुष्य जगलं आहे. आता जर मला लोकांशी संवाद साधण्याची, त्यांच्याशी जोडलं जाण्याची संधी मिळत असेल तर मी तीदेखील स्वीकारेन.

अधिक वाचा  समरगीत स्पर्धेत कमिन्स इंडिया संघाला प्रथम क्रमांक

राजकारण आणि फिल्मी दुनियेत किती फरक ?

राजकारणातील जीवन हे चित्रपटांपेक्षा पूर्णपणे वेगळे असते. हे सर्व सुखावणारे आहे का ? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली की, चित्रपटांचं जग खोटं असतं. त्यासाठी वेगळे वातावरण तयार केलं जातं. लोकांना आकर्षित करण्यासाठी एक बबल तयार केला जातो. पण राजकारण हे वास्तव असतं. मला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत, लोकसेवेच्या या माध्यमात मी तशी नवीन आहे, मला शिकण्यासारखं खूप काही आहे, असं कंगनाने स्पष्ट केलं.

कंगनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती आत्तापर्यंत गँगस्टर, क्वीन, थलाइवी, तनु वेड्स मनु, फॅशन, मणिकर्णिका, यासारख्या अनेक दमदार चित्रपटात झळकली. इमर्जन्सी हा तिचा आगामी चित्रपट असून त्यामध्ये तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. येत्या जून महिन्यात हा चित्रपट रिलीज होणार आहे.