नाशिक लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेल्या नाही. आता नाशिकच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट बघायला मिळत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अजित पवार गटाचे पदाधिकारी अंबादास खैरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेतल्याने नाशकात खळबळ उडाली आहे. अंबादास खैरे यांनी त्यांचे बंधू आणि मंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक, निकटवर्तीय आणि विश्वासू असलेले राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा समता परिषदेचे अध्यक्ष दिलीप खैरे यांच्यासाठी हा अर्ज घेतल्याचं अंबादास खैरे यांनी सांगितले. ही छगन भुजबळांची मोठी खेळी असल्याचं बोललं जात आहे. थोड्याच वेळापूर्वी मंत्री छगन भुजबळ हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. त्यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठा ट्विस्ट बघायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिक लोकसभेसाठी आज (२६ एप्रिल) अर्ज घेण्यास सुरुवात झाली असून अद्यापही महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. नाशिकचा तिढा अजूनही सुटेला नसून अनेक इच्छुकांचा जीव भांड्यात अडकला आहे. खरंतर नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा विद्यमान खासदार आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी मोठी ताकद पणाला लावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आतापर्यंत तब्बल दहा ते बारा वेळा भेटी त्यांनी घेतल्या आहेत. त्यामुळे गोडसे हे दावा सोडण्यास तयार नाही. खासदार हेमंत गोडसेंनी मतदारसंघात प्रचारही सुरू केला असून अनेक महिन्यांपासून ते प्रचार करत आहे. स्वतः मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांना प्रचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत नाशिकची जागा शिवसेना लढवणार अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. त्यासोबतच शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचेही नाव चर्चेत आहे.
भाजपकडून देखील नाशिक लोकसभेवर दावा सांगितला जात आहे. भाजपकडून १००८ स्वामी शांतिगिरी महाराज, एडवोकेट राहुल ढिकले, दिनकर पाटील इच्छुक आहेत. मात्र, सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नाशिक लोकसभेसाठी आग्रही झाला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी जिल्ह्यात बघायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अनेक उमेदवारांची नावे चर्चेत आहेत त्यामध्ये माजी खासदार देविदास पिंगळे आमदार एडवोकेट माणिकराव कोकाटे यांचे नाव प्रामुख्याने आघाडीवर आहे. मात्र, आज भुजबळांचे निकटवर्तीय विश्वासू असलेल्या दिलीप खैरे यांचे नाव चर्चेत आले आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व दिलीप खैरे यांचे बंधू अंबादास खैरे यांनी अर्ज घेतला आहे. त्यांनी दिलीप खैरे यांच्यासाठी अर्ज घेतला असल्याचे सांगितले. दिलीप खैरे हे छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक मानले जातात व ते छगन भुजबळांची संघटना असलेल्या समता परिषदेचे अध्यक्ष देखील आहेत. त्यामुळे भुजबळांच्या गोटातूनच उमेदवार असणार का? अशा चर्चा रंगात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातच दोन गट पडले असून एकीकडे माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांच्यासारखे मराठा बहुल चेहरा निवडणुकीच्या रिंगणात द्यावा अशी काही कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र आज अचानक मोठ ट्विस्ट समोर आलं असून अंबादास खैरे यांनी दिलीप खैरेंसाठी अर्ज घेतला आहे. मंत्री छगन भुजबळांची ही मोठी खेळी मानली जात आहे. थोड्याच वेळापूर्वी छगन भुजबळ हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले असून आता मुंबईत काय घडामोडी होतात? नाशिकची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटते का? याकडे सर्वच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.