टी-20 वर्ल्ड कप 2024 सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. 1 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. आणि यासाठी अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची घोषणा कधी पण केल्या जाऊ शकते.
आयसीसीने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघ घोषित करण्यासाठी 1 मे ही तारीख दिली आहे. म्हणजेच या तारखेपर्यंत सर्व देशांना आपापले संघाची घोषणा करायची आहे. भारतीय चाहतेही आपल्या संघाची निवड होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएल 2024 मधील चमकदार कामगिरीच्या जोरावर कोणत्या 15 जणांना वर्ल्ड कपचं तिकीट मिळणार यांची उत्सुकता सर्वांना आहे.
पाच फलंदाज
कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव वर्ल्ड कप खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि रिंकू सिंग यांनाही खेळण्याची संधी मिळू शकते. यशस्वीने अलीकडच्या काळात बॅटने उत्कृष्ट कामगिरी केली आहे, तर रिंकू सिंगनेही फिनिशरची भूमिका उत्तमरित्या पार पाडली आहे.
दोन विकेटकीपर
ऋषभ पंत आणि संजू सॅमसन हे वर्ल्ड कप संघात असू शकतात. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत भीषण अपघातानंतर नुकताच व्यावसायिक क्रिकेटमध्ये परतला आहे. पंतने काही स्फोटक खेळी खेळून फॉर्ममध्ये येण्याची चिन्हे दाखवली आहेत.
दुसरीकडे संजू सॅमसनला दुसरा यष्टिरक्षक म्हणून जागा मिळू शकते. संजू सध्याच्या आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्ससाठी फलंदाजीत चमकदार कामगिरी करत आहे.
तीन ऑलराउंडर
ऑलराउंडरमध्ये शिवम दुबे हा या जागेसाठी हार्दिक पांड्याशी स्पर्धा करत असल्याचे मानले जाते, पण या दोन्ही खेळाडूंना संघात स्थान मिळू शकते. हार्दिक आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे. आणि शिवम दुबे सध्या सीएसकेसाठी उत्कृष्ट कामगिरी करत आहे. यासोबत अष्टपैलू रवींद्र जडेजाचाही संघात जागा जवळपास निश्चित आहे. अक्षर पटेलपेक्षा जडेजाला प्राधान्य दिले जाऊ शकते.
दोन स्पिनर्स
कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांचा वर्ल्ड कप संघात फिरकी गोलंदाज म्हणून समावेश केला जाऊ शकतो. लेग-स्पिनर चहल हा टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे आणि तो आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. टी-20 वर्ल्ड कप वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये होणार असल्याने संथ खेळपट्ट्यांवर कुलदीप आणि चहलची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.
तीन घातक गोलंदाज
जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांना गोलंदाजी युनिटमध्ये स्थान मिळणार निश्चित झालेले दिसत आहे. त्याचबरोबर तिसरा स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराजचाही समावेश केला जाऊ शकतो. सध्याच्या आयपीएल हंगामात सिराज नक्कीच महागडा ठरला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे.