चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे राज्याचं लक्ष असणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात काँग्रेसचा केवळ एक उमेदवार निवडून आला होता. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले बाळू धानोरकर यांनी राज्यात काँग्रेसची लाज राखली होती. राज्यातून काँग्रेसला हद्दपार करण्याच्या भाजपच्या इराद्याला बाळू धानोरकर यांनी अटकाव केला होता. मात्र, त्यांचे अकाली निधन झाले. नियमानुसार चंद्रपूरमध्ये पोटनिवडणुका घेणे आवश्यक होते, पण तसं झालं नाही.

बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसनं लोकसभेचं तिकीट दिलं आहे. बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे प्रतिभा यांना सहानभूती मिळेल असा काँग्रेसला विश्वास आहे. खरंतर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून आपली मुलगी शिवानी वडेट्टीवार यांना तिकीट देण्याची मागणी लावून धरली होती. पण, शेवटी काँग्रेस वरिष्ठांनी प्रतिभा धानोरकर यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

सुधीर मुनगंटीवार मैदानात-

चंद्रपूरची सल भाजपला आजही बोचत आहे. याच कारणामुळे भाजपने राज्यातील प्रमुख नेते सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. सुधीर मुनगंटीवार हे लोकसभेसाठी इच्छुक नव्हते. त्यांनी तसं बोलूनही दाखवलं होतं. पण, भाजप हायकमांडचा आदेश मानावा लागत असल्याने मुनगंटीवारांचा नाईलाज झाला. मुनगंटीवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र, मुनगंटीवार हे लोकसभेसाठी इच्छुक नाहीत असा संदेश त्यांच्या समर्थकांपर्यंत गेला आहे.

अधिक वाचा  EVM हॅक होऊचं शकत नाही कारण…; विरोधकांचे आरोप मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी फेटाळले

चंद्रपूरमध्ये जातीचा मुद्दा-

चंद्रपूरमध्ये ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहेत. २०१९ पूर्वी मतदारसंघात जातीच्या मुद्द्यावरुन निवडणुका झाल्या नव्हत्या. पण, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्य विरुद्ध बहुसंख्य अशी लढत पाहायला मिळाली होती. त्याचा फायदा बाळू धानोरकर यांना झाला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही जातीचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. कारण, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा ओबीसी बहुल आहे.

प्रतिभा धानोरकर या कुणबी समाजाच्या आहेत. त्यामुळे ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा जेव्हा तापला होता तेव्हा विदर्भामध्ये याचे पडसाद उमटले होते. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास विदर्भातील कुणबी आणि ओबीसी समाजाने तीव्र विरोध केला होता. विशेषत: चंद्रपूरमध्ये ओबीसी महासंघाने या मुद्द्यावरुन आंदोलन केलं होतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करुन आंदोलन थांबवावं लागलं होतं. त्यामुळे मतदारसंघातील ओबीसींचा रोष महायुतीवर असेल असं बोललं जातंय.

अधिक वाचा  देशाचे 30 मुख्यमंत्री कोणत्या समाजाचे? 4 ब्राह्मण, ओबीसी, उच्च, अल्पसंख्यांक पण दलित मात्र नाहीचं

चंद्रपूरमध्ये सहा विधानसभा-

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभेच्या जागा आहेत. यवतमाळमधील वणी, आर्णी आणि बल्लारपूर या तीन लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत. बल्लारपूरमधून सुधीर मुनगंटीवार हे आमदार आहेत. चंद्रपूरमधून अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे आमदार आहे. त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. राजुरा आणि वरोरामधून काँग्रेसचे आमदार आहेत. वरोरामधून प्रतिभा धानोरकर यांनी विजयी होऊन सर्वांनाच धक्का दिला होता.

हंसराज अहिर यांची नाराजी-

सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूरचे पालकमंत्री आहेत. राज्यात ते मंत्री राहिलेत. बल्लारपूरमध्ये केलेल्या विकासकामांचा त्यांना फायदा होईल. पण, चारवेळा खासदार राहिलेले हंसराज अहिर यांना तिकीट न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. शिवाय, मुनगंटीवार यांच्यामुळे आपला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असा समज हंसराज अहिर यांच्यामध्ये आहे. त्यामुळे, या दोन्ही नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरु आहे. अहिर यांच्या नाराजीचा मुनगंटीवार यांना किती फटका बसेल हे निकालाच्या वेळीच सांगता येईल.

अधिक वाचा  ‘लाडक्या देवाभाऊ’चा चाणक्य बनण्याचा प्रवास कसा?; 22 व्या वर्षी नगरसेवक 27 व्या वर्षी महापौर ते मुख्यमंत्री!

प्रतिभा धानोरकर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये चुरशीची लढत होईल हे मात्र नक्की आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मतदारसंघात सभा घेतल्या आहेत. प्रतिभा धानोरकरांना देखील मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मतदार कोणाला पसंती देतील हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल. पण, सध्या फिफ्टी-फिफ्टीचे वातावरण दिसून येत आहे.