‘‘आधुनिक समाज म्हणून आपण ऐतिहासिक तथ्ये स्वीकारायला हवीत. मुस्लिमांसाठी ज्याप्रमाणे मक्का आणि मदिना पवित्र आहेत. त्याचप्रमाणे हिंदूंसाठी काशीतील ज्ञानवापी आणि मथुरेतील कृष्ण जन्मस्थळ पवित्र आहेत. मुस्लिमांच्या दृष्टीने तेथे फक्त एक मशीद आहे. त्यामुळे त्यांनी ती स्वतःहून हिंदूंना सुपूर्त करावी आणि हिंदूंनीही राष्ट्रहितासाठी येथेच थांबावे,’’ असे आवाहन ज्येष्ठ पुरातत्त्वशास्त्रज्ञ के. के. मोहम्मद यांनी केले.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर येथे आयोजित ‘भारत ः विरासत आणि संस्कृती’ या व्याख्यानात ते बोलत होते. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण उत्तर भारताचे माजी संचालक असलेले मोहम्मद यांनी चंबळ खोऱ्यातील बटेश्वर मंदिर शृंखलेचे पुनर्निर्माण आणि राम मंदिराच्या सर्वेक्षणासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘काशी आणि मथुरेतील जन्मस्थळाशी ना प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा संबंध आहे, ना एखाद्या औलियाचा संबंध आहे, परंतु हिंदूंसाठी ते देवांचे जन्मस्थान आहे. हिंदू समुदायाने मध्ययुगीन कालखंडात उद्‌ध्वस्त झालेली तीन ते चार हजार मंदिरे मागितली नाहीत. त्यांनी तसे केले तर देशात हाहाकार माजेल. देशाच्या हिताच्या दृष्टीने हिंदूंनी येथेच थांबावे.’’
पुणे संवाद, डेक्कन कॉलेज आणि भांडारकर संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया, डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. प्रमोद पांडे, पुणे संवादचे संयोजक मनोज पोचट, केदार नाईक आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  टीम इंडिया-श्रीलंका आमनेसामने, आशिया कप फायनलमधील पराभवाचा वचपा घेण्याची संधी, कोण जिंकणार?

फिरोदिया म्हणाले, ‘‘मध्ययुगीन कालखंडात आक्रमणामुळे हजारो मंदिरे आणि स्तूप उद्‌ध्वस्त करण्यात आले. अनेक आक्रमणांनंतर आणि डाव्या इतिहासकारांच्या अस्तानंतर आपण खऱ्या अर्थाने खरा इतिहास अभ्यासतो आहोत.’’ भारतासारख्या देशात शास्त्रीय पुरातत्त्व उत्खननाचे विशेष महत्त्व आहे, असे मत डॉ. पांडे यांनी व्यक्त केले.

माझा आत्मक्लेष…
मध्ययुगीन कालखंडात झालेल्या आक्रमणाला आणि मंदिर विध्वंसासाठी आजचे मुस्लिम जबाबदार नाहीत. मात्र, या आक्रमणाचे कोणत्याही प्रकारे समर्थन करणारे नक्कीच दोषी आहेत. माझ्या पूर्वजांकडून भारतातील हजारो मंदिरांचा विध्वंस झाला. त्याचा आत्मक्लेष म्हणून माझ्या हातून हे प्राचीन मंदिरांच्या पुनर्निर्माणाचे कार्य झाले, अशी भावना के. के. मोहम्मद यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा  हरियाणात काँग्रेसची पिछेहाट चेहरे पडले, जल्लोषही थांबला; भाजपाने बहुमताचा आकडाही केला पार

भाजपचा आखडता हात
मध्य प्रदेशातील चंबळच्या खोऱ्यात बटेश्वरच्या उत्खननासाठी किंवा मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी भाजप सरकारने पुरेसा निधी न दिल्याची टीका के. के. मोहम्मद यांनी केली. दरोडेखोरांमुळे बटेश्वरचे मंदिर सुरक्षित राहिले, पण त्यांचा खातमा झाल्यानंतर तेथे खान माफियांनी उच्छाद मांडला. त्यावेळी भाजप सरकारने काही मदत केली नाही. शेवटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर यंत्रणा हलली, असा अनुभवही त्यांनी सांगितला.