महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीच्या दिशेने रवाना झाले होते. दिल्लीत आधीच भाजपची कोअर कमिटीची बैठक सुरु आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहेत. त्यामुळे राज ठाकरेंच्या दिल्लीवारीने राज्यात भाजप-मनसे युतीची चर्चा सुरु झाली. त्यामुळे जर लोकसभेच्या तोंडावर भाजपची मनसे सोबत युती झाली तर, महायुतीला कोणत्या मतदार संघात फायदा होणार? हे जाणून घेऊयात….
राज्यात गेल्या अनेक महिन्यापासून भाजप-मनसेच्या युतीची चर्चा सुरू आहे. नेत्यांच्या भेटीगाठी होतायत. पण युतीच घोड अडलं होतं. आज कुठेतरी भाजप-मनसेच्या युतीच्या हालचालींना वेग आला आहे. राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत राज ठाकरेंची आता देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखऱ बावनकुळे आणि दिल्लीतील अनेक नेत्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत भाजप-मनसेच्या युतीबाबत चर्चा होणार आहे.
आगामी लोकसभेच्या तोंडावर भाजप मनसेला सोबत घेण्याची तयारी करतेय आहे. यामागचं कारण म्हणजे महायुतीत मुंबईतील लोकसभेच्या अनेक जागांवरून वाद आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी मनसेला सोबत घेण्याचे प्रयत्न सूरू आहे. तसेच भाजपने मनसेला सोबत घेतल्यास दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, पुणे या चार जागांवर भाजपला फायदा होणार आहे.
या चारही मतदार संघात मराठी मतदारांचा आकडा मोठा आहे. तसेच राज ठाकरेंचे या मतदार संघात येणे जाणे असते. त्यामुळे राज ठाकरेंच्या द्वारे ही मते भाजप आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी ही युती होत असल्याची चर्चा आहे. याआधी मराठी मते ही फुटत होती. त्यामुळे राज ठाकरेंच्या येण्याने ही मते थेट भाजप महायुतीला मिळणार असून लोकसभेत त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे भाजप मनसेला सोबत घेण्याची चर्चा आहे. आता भाजप-मनसे युती होते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.