राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी शनिवारी (ता .९) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांची भेट घेतली.
आयुष्यभर एकमेकांच्या विरोधात असलेले दोन्ही ज्येष्ठ नेत्यांची उतार वयात राजकारणासाठी झालेल्या भेटीने तालुक्याच्या राजकारणातील फेरबदलाचे वारे थांडवण्याचे संकेत दिले. माळवाडी (ता. भोर) येथील आनंदराव थोपटे यांच्या निवासस्थानी शनिवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास शरद पवार पोहोचले.
त्यांच्यासमवेत राज्याचे माजी महसूलमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी खासदार नानासाहेब नवले उपस्थित होते. आमदार संग्राम थोपटे, राजगड ज्ञानपीठाच्या सचिव स्वरूपा थोपटे आणि पृथ्वीराज थोपटे यांनी त्याचे स्वागत केले. पवार आणि थोपटे यांनी सुमारे अर्धा तास चर्चा केली.
यापूर्वी शरद पवार आणि अनंतराव थोपटे हे दहा वर्षापूर्वी जून २०१४ मध्ये भोरचे माजी नगराध्यक्ष अमृतलाल रावळ यांच्या शोकसभेच्या कार्यक्रमात दोघे एका एका व्यासपीठावर दिसले होते. पुणे जिल्ह्यातील राजकारात पवार आणि थोपटे हे एकमेकांचे शत्रू म्हणून ओळखले जात होते.
मात्र, आताची राजकीय परिस्थिती पाहता, महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी दोघांनाही एकमेकांशी जुळवून घेतले. अर्ध्या तासानंतर शरद पवार व बाळासाहेब थोरात हे कापूरव्होळ येथील महविकास आघाडीच्या एकनिष्ठ महासभेसाठी व शेतकरी मेळाव्यासाठी रवाना झाले. पवार आणि थोपटे यांच्यामध्ये काय चर्चा झाली याचीच चर्चा तालुक्यात सुरू आहे.