उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ अत्यंत प्रतिष्ठेचा केला आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याच विचाराचा खासदार निवडून आणायचा, असा चंग त्यांनी बांधला आहे. विकासकामांच्या जोरावर जनतेच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय अजितदादांनी घेतला आहेत. त्यामुळे येत्या २ दोन मार्च रोजी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी बारामतीत एकत्र येत आहेत. महायुतीचे हे तीनही नेते एकत्र येत असल्याने ते बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचा शुभारंभ करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बारामती येथे अत्याधुनिक बस स्थानक उभारण्यात आले आहे. तसेच, तालुक्यातील बऱ्हाणपूर येथे पोलिस उपमुख्यालय आणि बारामती शहरात पोलिस अधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. या विकासकामांच्या उद्घाटनासाठी महायुतीचे हे तीनही नेते एकत्र येणार आहेत.
बारामती मतदारसंघातून मी उभा केलेल्या उमेदवारालाच निवडून द्या. लोकसभेला एक आणि विधानसभेला एक असं मला चालणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीत माझ्या उमेदवारासोबत दगाफटका झाला, तर मी विधानसभा निवडणुकीबाबतही वेगळा विचार करेन, अशी निर्वाणीची भाषा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बूथ कमिटी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वापरली होती. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही लोकसभेची तयारी जोरदारपणे सुरू केली आहे. त्या स्वतः शरद पवार आणि इतर सदस्यही सुळे यांच्यासाठी प्रचार करण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनीही शरद पवार गटाला साथ देण्याचा निर्णय घेत आत्या सुप्रिया सुळे यांच्यासोबत राहण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. त्यामुळे बारामतीच्या राजकारणात अजित पवार एकाकी पडण्याची भीती त्यांनी स्वतःच व्यक्त केली आहे. तशी तयारी त्यांनी सुरू केली आहे.
बारामतीत आतापर्यंत केलेली विकासकामे जनतेसमोर ठेवूनच ते लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच अजितदादा हे प्रत्येक भाषणात विकासकामांचा हवाला देत आहेत. माझ्या एवढं काम कुठल्याही पठ्ठ्याने करून दाखवावे, असे आव्हान ते देत असतात.
बारामती येथे सुमारे 50 कोटी रुपये खर्च करून भव्यदिव्य असे बस स्थानक उभारले आहे. बऱ्हाणपूर येथे पोलिस उपमुख्यालय उभारण्यात आले आहे, तसेच बारामती शहरात पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी घरे बांधण्यात आली आहेत. या सर्व विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमातून महायुती आपल्या प्रचाराचा नारळ वाढविण्याची शक्यता आहे.