मराठा कार्यकर्ते अजय बावसकर महाराज आणि संगीता वानखेडे यांच्या खळबळजनक आरोपानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आरोपांच्या कचाट्यात सापडले आहेत. या आरोपानंतर जरांगेंच्या मराठा आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न सूरू असल्याची चर्चा आहे. असे असताना आता जरांगेंच्या गाडीवर भ्याड हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यातून सुदैवाने मराठा कार्यकर्ते बचावले आहेत. दरम्यान हा भ्याड हल्ला छगन भुजबळ आणि त्यांच्या बगलबच्चांनी केल्याचा आरोप आता मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी केला आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आंदोलनात सातत्याने सहभाग घेणारे बीडचे गंगाधर काळकुटे पाटील यांच्या गाडीवर गुरुवारी रात्री गोंदी पोलीस ठाणे हद्दीत भ्याड हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत गाडीच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. ड्रायव्हर सीट जवळील काचा फोडण्यात आल्या होत्या. या हल्ल्याप्रकरणी आता गोंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसात मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लढा देणाऱ्यांना विचलित करण्याचा, मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन चिरडण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु आम्ही अशा हल्ल्यांना भीक घालणार नाही, आणि मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे गंगाधर काळकुटे पाटील यांनी म्हटले आहे.
हा भ्याड हल्ला आहे. आम्ही मनोज जरांगेंना भेटून वडीगोद्रीच्या जालना जक्शन येथे चहा पीत असताना हा हल्ला झाला. सुदैवाने आम्ही गाडीत कुणीही नव्हतो, असे गंगाधर काळकुटे यांनी सांगितले. तसेच असे हल्ले करून राज्यकर्ते आमच्या आरक्षणाचा लढा थांबवू पाहत आहेत, मनोज जरांगेंचे आंदोलन थांबवू पाहत आहेत. पण त्यांना आमचा इशारा आहे, आमचा शेवटचा श्वास हृदयात असेपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबू देणार नाही, असे काळकुटे यांनी सांगितले.
नाशिक, रायगड, मुंबईच्या दौऱ्यावर असतानाही अशा घटना घडल्या आहेत. गेल्या चार-पाच महिन्यांपासून आम्हाला ओव्हरटेक करणे सूरू आहे, आमच्या जीवीताशी खेळण्याचा हा प्रकार आहे. यामागे छगन भुजबळ आणि त्यांचे बगल बच्चे असण्याची शक्यता आहे आणि त्यांनीच हा हल्ला केला असावा,असा आरोप काळकुटे यांनी केला आहे. आमच्यावर दबाव टाकून मनोज जरांगेंची ताकद कमी करण्याचा तथाकथित ओबीसी नेत्यांचा प्रयत्न असावा,असा आरोपही त्यांनी यावेळी केला.