मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर करण्यात आला. विधीमंडळाचं आज मराठा आरक्षणासाठीच एकदिवशीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं. या अधिवेशनाचं कामकाज संपल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. फडणवीस यांच्या आधी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचा मसुदा विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात पास झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. मराठा आरक्षणाबाबात सरकारच्या प्रमाणिक प्रयत्नांवर त्यांनी समाधान व्यक्त केलं. नोकर भरतीत तातडीने मराठा समाजाच्या तरुणांना आरक्षण देण्यात येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच सुप्रीम कोर्टातही हे आरक्षण टिकेल, असंही ते म्हणाले. त्यांच्या या भूमिकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उद्धव ठाकरे यांचा आमच्यावरतीच विश्वास, अशी प्रतिक्रिया दिली.
“एकदा कायदा पास झाला की आता सरकारी नोकरीच्या जेवढ्या जाहिराती निघतील त्यामध्ये मराठा समाजाचं आरक्षण असेल. उद्धव ठाकरे यांचा आमच्यावर विश्वास आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यांचा विश्वास योग्य आहे ते आम्ही दाखवून देऊ”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “मला असं वाटतं की, आता हे विधेयक पास झाल्यानंतर सर्व नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासमोरच विधेयक पास झालं आहे. त्यांना असा प्रश्न पडण्याचं काही कारणच नाही. पण मला हे माहिती आहे की, त्यांचा आमच्यावरच विश्वास आहे. त्यांना माहिती आहे की, मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात सवलात कोणी देऊ शकेल ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारच देऊ शकेल. हे त्यांनादेखील माहिती आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फडणवीसांनी सांगितला तांत्रिक मुद्दा
“मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिलं तेव्हा सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं होतं. त्यानंतर पुन्हा 16 टक्के आरक्षण दिलं तर न्यायालयाने 12 आणि 13 टक्के लॉजिकली केलं होतं. पण आता राज्य मागासवर्ग आयोगाने सुप्रीम कोर्टाने जे काही निकष दिले, त्या निकषांच्या आधारावर ज्यावेळेस पाहणी केली, त्या पाहणीच्या आधारावर त्यांनी रिपोर्ट दिला आहे. शेवटी आपल्याला आरक्षणाची टक्केवारी ठरवताना जो काही आपला रिपोर्ट असतो, त्यामधले जे काही निरीक्षण असतात आणि न्यायालयाने वेळोवेळी दिलेले आदेश असतात, याच्या आधारावरच आपल्याला हा निर्णय करावा लागतो. जसं EWS ला 10 टक्के आरक्षण करावं लागतं, तसंच एसीबीसीलाही 10 टक्के आरक्षण देण्यात आलं आहे”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली.
‘याबाबतचे प्रश्न आपण उद्धव ठाकरेंना विचारा’
यावेळी देवेंद्र फडणवीस यांना मुस्लिमांना मराठा आरक्षण देणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उद्धव ठाकरेंना हा प्रश्न विचारा, असं उत्तर दिलं. “याबाबतचे प्रश्न आपण उद्धव ठाकरेंना विचारा की, त्यांचे सहकारी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणत आहेत की, मुसलमानांना आरक्षण दिलं जायला पाहिजे. हा प्रश्न माझ्यापेक्षा आपण उद्धव ठाकरेंना विचारु शकता. आमची पहिल्या दिवसापासून भूमिका पक्की आहे की, धार्मिक आधारावर आरक्षण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानात उल्लेख नाही. आम्ही संविधानाची शपथ घेतली आहे. त्यामुळे संविधानापेक्षा वेगळा निर्णय भाजप आणि महायुतीचं सरकार घेऊ शकत नाही”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.