राज्य सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण आज (मंगळवार) विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधेयक मांडण्यात आले. तसेच एकमताने मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्यात आले. त्यामुळे आता मराठा समाजाला शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण असणार आहे. दरम्यान हे विधेयक मंजूर झाल्यानंतर ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ हे सभगृहात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
अधिवेशनात भुजबळ काय म्हणाले?
मला आरक्षणाचा विरोध करायचा नाही, पण जरांगे मला धमक्या देतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आईवरुन शिव्या दिल्या. महसूल आयुक्त, एसपी, कलेक्टर यांना आईवरून शिव्या देण्यात आल्या. ही दादागिरी काय चाललीय, त्याला अटकाव करणार आहात की नाही असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.
२७ तारखेला त्यांना सांगण्यात आलं होतं, त्यांनी गुलाल उधळला फटाके वाजवले आणि १० तारखेला पुन्हा उपोषणाला बसले. अनेक शहरात बसगाड्या फोडल्या, राज्यात भीतीचं वातावरण निर्माण करत आहेत. हे थांबायला पाहिजे.
हे सगळं झाल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की, मी उपोषणावरून उठणार नाही. यांचं आंदोलन सुरूच राहणार. आपण मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा ठराव केला तरी यांचं आंदोलन सुरूच. आपण काही बोललं की हे धमकी देणार. आता त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला हे आरक्षण नको, आम्हाला ओबीसीतच आरक्षण द्या. त्यांची ही दादागिरी आणि खोटेपणा आहे, असेही भुजबळ म्हणाले.
तुमच्या सुरक्षेबाबात चिंतेंची मी नोंद घेतली आहे, जर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या जीवहानीची काळजी वाटत असेल तर ती व्यक्त करणं रास्त आहे. सरकारनं उचित उपाययोजना करावी असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
विधानसभेच विधेयक मंजूर झाल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, मी शब्द पाळतो. त्यामुळे लोक माझ्यावर विश्वास ठेवतात. मी मागचा विषय काढणार नाही. मनोज जरांगे पाटील यांनी उभ्या केलेल्या आंदोलनाचा हा विजय आहे. मराठ्यांच्या इच्छापुर्तीचा हा दिवस आहे. सर्व समाजासाठी आमची समान भूमिका आहे. ना कोणावर अन्याय ना कोणाला धक्का दिला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, समस्त राज्याला आणि ओबीसींना सांगतो की त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यायचा निर्णय घेतला आहे. मराठ्यांना नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण द्यायचा निर्णय घेतलाय. . मला एका जातीचा किंवा धर्माचा विचार करता येत नाही. मराठा असेल किंवा इतर समाज असेल त्यांच्याबद्दल तीच भावना व्यक्त केली असती.