ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी गोळीबार झाला. दहिसर भागात ही घटना घडल्यानंतर, बोरिवलीच्या करुणा रुग्णालयात अभिषेक घोसाळकर यांना दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती काहीशी चिंताजनक असल्याचे सांगितलं जात आहे.

घटनेची माहिती मिळाताच ठाकरे गटाचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने रुग्णालयाबाहेर गर्दी करत आहेत, तर या ठिकाणी पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का आहे. अभिषेक हे माजी आमदार आणि उद्धव यांचे विश्वासू नेते विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव आहेत. अभिषेक यांच्या पत्नी प्रीती घोसाळकर या सध्या नगरसेविका आहेत.

अधिक वाचा  पुण्यातील धरण क्षेत्रात साठवणीत हळूहळू वाढ; खडकवासला सर्कलमधील पाणीसाठा ५.७७ टीएमसीवर

मुंबई उपनगरात शिवसेना वळवण्यासाठी घोसाळकर परिवाराने खूप मेहनत घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरसुद्धा घोसाळकर परिवार मातोश्रीपासून दूर झाला नव्हता. सध्या आगामी निवडणुकांच्या तयारीला हे कुटुंब लागले असताना युवा नेता अभिषेक यांच्यावर हल्ला झाल्याने बोरिवली आणि दहिसर परिसर हादरला आहे.

हा गोळीबार मॉरिस नावाच्या व्यक्तीने केल्याची माहिती समोर आली असून, विशेष म्हणजे गोळीबारानंतर या मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने स्वत:वर सुद्धा चार गोळ्या झाडून घेतल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आज सायंकाळी साडेसातच्या आसपास अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार केला गेला.

अधिक वाचा  पुणे पोलिसांची अवजड वाहनांवर कारवाई – ४८ तासांत २८ गुन्हे दाखल

अवघ्या काही दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस स्टेशनमध्येच शिवसेना शिंदे गटातील महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. ज्यामध्ये महेश गायकवाड यांना सहा गोळ्या लागल्याने ते सध्या गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा ही गोळीबाराची घटना समोर आल्याने, कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.