मंचर – ‘जुन्नर वनविभागात आंबेगाव, खेड, जुन्नर व शिरूर तालुक्यात सध्या असलेली बिबट्यांची संख्या देशात सर्वाधिक आहे. प्रामुख्याने मंचर वन परीक्षेत्र विभागात व शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यात होणारा मानव व बिबट संघर्ष टाळण्यासाठी व बिबट्यांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी नसबंदी करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे.’ अशी माहिती जुन्नर वनविभागाचे उपसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली.
अवसरी-पेठ (ता. आंबेगाव) येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात उभारलेल्या अद्यावत सभागृहाचे उद्घाटन सातपुते यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक संदेश पाटील, मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस, वनपाल संभाजीराव गायकवाड,प्रदीप कासारे, वनरक्षक रईस मोमीन यांच्यासह वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
सातपुते म्हणाले, ‘सध्या दररोज बिबट्यांचे दर्शन होत असून हल्ल्याच्या घटना घडत आहेत. वनखात्यामार्फत ताबडतोब घटनास्थळी भेट देऊन पंचनामे करून दिलासा दिला जातो.जनजागृती केली जाते.या भागात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांना लपन भेटते. ऊसतोडणीची कामे सुरु असल्यामुळे निवारा व भक्षासाठी बिबट्यांचा संचार वाढला आहे.’
‘बिबट नर व मादीची वागणूक, बिबट्याचे पाऊल खुणा, बिबट्याचा हल्ला करण्याची पद्धत, मादीची प्रजनन क्षमता त्याचा कालावधी, बिबटे बछडे वयानुसार त्यांची वाढ, वजन, आहार याविषयी सविस्तर माहिती राजहंस यांनी दिली.
‘बिबट मादी दरवर्षी दोन ते चार बछड्यांना जन्म देते. दीड वर्षानंतर ते शिकार करण्यास सुरुवात करतात.वाढती बिबट संख्या रोखण्यासाठी नसबंदी करणे गरजेचे आहे. त्यासाठी बिबट्यांचे सर्वेक्षण करून अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.