मुंबईः मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा जिंकल्याचं जाहीर करत मराठा मोर्चा मागे घेतला आहे. मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांनी जरांगेंच्या हाती अधिसूचना देऊन लढा जिंकल्याच्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी टिपण्णी करत, हा केवळ मसूदा असून १६ फेब्रुवारीपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. तोपर्यंत ओबीसी बांधवांनी हरकती नोंदवायच्या आहेत.. असं म्हणत मराठे ओबीसीमध्ये जात असल्याची भीती व्यक्त केली.
मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी छगन भुजबळ यांना उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, मराठ्याना मागच्या दाराने ओबीसी आरक्षणात घेण्याचा प्रयत्न होतोय, असं म्हणणं चुकीचं आहे. एक मंत्री म्हणून भुजबळांनी असे बिनबुडाचे विधानं करु नयेत.
विनोद पाटील पुढे म्हणाले की, भुजबळांनी छातीवर हात ठेवून सांगावं, खरोखरच मराठा ओबीसीमध्ये आलाय का, खरोखर ५४ लाख नोंदींनुसार प्रत्येकी ४ जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळालंय का? तुम्हाला सगळं माहिती आहे, विनाकारण समाजात तेढ निर्माण करु नये. मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासंबंधी कुठलाच निर्णय झालेला नाही. सर्व मराठ्यांना अद्याप आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे विनाकारण न्यायालयाची भाषा कशाला करता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.