मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ खरी करून दाखवली. शेवटी प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. महायुती सरकारने मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासाठी कष्ट घेतले. मेहनत घेतली. मी सुद्धा याच विचारांचा आहे. सर्वांना मान्य होईल असा चांगला मार्ग यातून काढला, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले.
मुख्यमंत्र्यांनी कष्ट घेतले. सातत्याने चर्चा करून मार्ग काढला. मी समाधान व्यक्त करतो, असे देखील अजित पवार म्हणाले. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मनोज जरांगे यांचे अभिनंदन केले आहे. जरांगेंच्या आंदोलनावर चांगला मार्ग निघाला. सगळ्या समाजाला न्याय देण्याचे काम सरकारने केला. ओबीसींवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, अशी ग्वाही देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
गुन्हे मागे घेणार नाही…
मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या आंदोलन तसेच नंतर झालेल्या आंदोलनामध्ये दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. यावर सरसकट गुन्हे मागे घेता येणार नाहीत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आंदोलनात गंभीर प्रकारचे कृत्य करणे, घरे जाळणे, हल्ला करणे असा स्वरुपाचे गुन्हे न्यायालयाच्या परवानगी शिवाय मागे घेत येत नाही, असे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले.