मुंबई : मराठा आरक्षणविषयक सर्व मागण्या पूर्ण झाल्यानंतर मनोज जरागेंचं आंदोलन आज अखेर संपलं. पण आता पुढे काय याबाबतची दिशाही जरांगेंनी स्पष्ट केली आहे. विजयी सभेत बोलताना त्यांनी आपली पुढची भूमिका मांडली.
मुख्यमंत्र्यांचे आभार
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर जरांगेंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यानंतर मराठा आंदोलकांमध्ये जल्लोषाचं वातावरण पहायला मिळालं. काहींच्या डोळ्यातून आनंदाश्रू देखील पहायला मिळाले. जरांगेंनी आंदोलकांना गावाकडं परतण्याचं आवाहन केलं आहे. त्याचसोबत गावाकडे जाऊन गुलाल उधळावा आणि दिवाळी साजरी करावी असेही ते म्हणाले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व आंदोलक आपापल्या वाहनांकडं परतत आहेत. यावेळी जल्लोष करत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणा देत परतीच्या वाटेवर निघाले आहेत.
आता पुढे काय?
आंदोलन यशस्वी ठरल्यानंतर आता पुढे काय करायचं? याबाबतही जरांगे म्हणाले, सगळ्यांनी गाड्या सावकाश चालवायच्या आहेत. आपण आपल्या गावाकडं गेल्यानंतर काय करायचं तो जल्लोष करायचा आहे. आंतरवालीत बैठक होणार आहे तिथून पुढची दिशा काय असेल? पुढे काय करायचं? यासाठी चर्चा होईल.
फक्त गाड्या सर्वांनी सावकाश चालवायच्या, जेवणं करुन सावकाश निघायचं आहे. तुम्ही आलात मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला. मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार. मराठ्यांनी तो टाकला. हा विजय महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांचा आहे, अशा शब्दांत जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.
जर धोका झाला तर…
तसेच बलिदान दिलेल्या सर्व बांधवांचं स्वप्न साकार झालं आहे. तसेच पुढे या आरक्षणात काही अडचणी झाल्या तर त्या सोडवायला मी सर्वात पुढं राहिलं. जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात आगोदर मुंबईला आझाद मैदानात मी उपोषणाला आलोच म्हणून समजा, असं आश्वासनही यावेळी मनोज जरांगे यांनी दिलं.