पुणे : शिवाजीनगर येथील आशा नगर येथे पुणे महापालिकेने बांधलेल्या पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनापूर्वी काँग्रेस पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये झटपट झाली. त्याचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर देखील पोलिसांनी दादागिरी केली. त्यामध्ये कॅमेऱ्याचे नुकसान झाले, पत्रकारांचे मोबाईल काढून घेऊन त्यांना उचलून नेण्यात आले, तर एका कॅमेरामनला पोलिसांनी ताब्यात घेऊन थेट गाडीमध्ये डांबल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पुणे श्रमिक पत्रकार संघाने या घटनेचा निषेध करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

पुणे महापालिकेने सुमारे साडेनऊ कोटी रुपये खर्च करून आशानगर येथे बारा लाख लिटर पाण्याची टाकी बांधलेली आहे. या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होते. या कार्यक्रमाचे आयोजन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले होते.

अधिक वाचा  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना ‘UBT’ पक्ष राज्यस्तरीय दर्जा,

दरम्यान, या टाकीची जागा ताब्यात घेणे भूमिपूजन करणे यासाठी काँग्रेसचे तत्कालीन नगरसेवक दत्ता बहिरट यांनी प्रयत्न केलेले होते. माझ्या प्रयत्नातून या टाकीचे पाण्यासाठी मोफत जागा मिळाली, निधी उपलब्ध करून दिला पण आज याची कदर न करता भाजप या कार्यक्रमाचे श्रेय लाटत आहे, असा आरोप केला होता. त्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपने काँग्रेसला सन्मानाने कार्यक्रमाला बोलवावे अन्यथा आम्हीच या ठिकाणी उद्घाटन करू असा इशारा दिलेला होता.

शुक्रवारी आशानगर येथे पाण्याच्या टाकीचा उद्घाटनाचा समारंभ होण्यापूर्वी काँग्रेसचे मोहन जोशी, आमदार धंगेकर, बहिरट रमेश बागवे यांच्यासह अन्य पदाधिकारी आशा नगर येथे उपस्थित झाले. पोलिसांनी त्यांना रोखले पण धंगेकरांनी आतमध्ये जाऊन नारळ फोडून टाकीचे उद्घाटन केले. यावेळी काँग्रेस व पोलिसांमध्ये झटापट झाली.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांची पुण्यातही शांतता रॅली;२५ लाखांहून अधिक मराठा बांधव सहभागी होण्याची शक्यता

या ठिकाणी वार्तांकन करणाऱ्या वार्ताहरांना पोलिसांनी मज्जाव केला. त्यांच्यासोबत पोलिसांनी झटापट केली, त्यात एका वृत्तवाहिनीच्या कॅमेऱ्याचे नुकसान झाले. पत्रकार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. कॅमेरा बंद पडल्याने मोबाईल मधून या घटनेचे वार्तांकन करत असताना पोलिसांनी वृत्तवाहिनीच्या वार्ताहराचा मोबाईल हिसकावून घेतला.

मोबाईल फॉरमॅट मारून सर्व व्हिडिओ डिलीट केल्याचा धक्कादायक प्रकार यावेळी घडला. त्यामुळे पत्रकार आणखीन संतापले त्याच वेळी पोलिसांनी एका कॅमेरामनला उचलून पोलिसांच्या व्हॅनमध्ये डांबून ठेवले. तर पत्रकाराला उचलून बाजूला काढले यामुळे आक्रमक झालेल्या पत्रकारांनी पोलिसांना जाब विचारून तेथे त्यांचा निषेध केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहोचून या प्रकरणात सारवासराव करण्याचा प्रयत्न केला. अखेर पत्रकारांच्या रोषाला सामोरे गेल्यानंतर कॅमेरामनची सुटका करून मोबाईल परत केला.