राष्ट्रवादीतील फुटीनंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर येणार आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये होणाऱ्या 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार आहेत. काका-पुतणे एकाच मंचावर येणार असल्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. याआधी दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन कार्यक्रमाला शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले होते. आता पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार आहेत.

पिंपरी चिंचवड येथे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात काका आणि पुतणे उपस्थित राहणार आहेत, हा शहरात चर्चेचा विषय आहे. या संमेलनाचे आयोजन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने केले जाणार आहे. तब्बल 25 वर्षानंतर शहरात नाट्यसंमेलन होणार आहे. याआधी 79 वे नाट्य संमेलन पिंपरी चिंचवड शहरातील मैदानावर झाले होते. त्यावेळी आयोजनाची जबाबदारी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खांद्यावर होती. त्याशिवाय दिवंगत शिक्षणमंत्री प्राध्यापक रामकृष्ण मोरे आणि युवा अजित पवार यांनाही जबाबदारी पार पाडली होती. यावेळी नाट्यसंमेलनाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे.

अधिक वाचा  गृहमंत्रिपदामुळे शपथविधी रखडला? महायुतीत पडद्यामागे काय घडतंय? पाहा स्पेशल रिपोर्ट

दोघांना मानणारे नेते –

पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात शरद पवार आणि अजित पवार या दोघांना मानणारे कार्यकर्ते अन् नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर दोन्ही नेते एकाच मंचावर येत आहेत. पुढील काही दिवसांत लोकसभा निवडणुका होणार आहेत. दोन्ही नेते काय बोलणार ? याकडे कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत.

टीका, टिपण्णी होणार का?

शरद पवार आणि अजित पवार यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर राज्यातील राजकारणाला वेगळी दिशा मिळाली आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन सत्तेत सहभागी जाण्याची भूमिका घेतली. तर शरद पवार यांनी विरोधातच राहण्याचं ठरवलं. मागील काही दिवसांमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या आहेत. अनेकदा दोघांनी एकमेकांवर अप्रत्यक्षरित्या टीका केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता हे दोघेही एकाच मंचावर भाषण करणार आहेत. यावेळी काय बोलणार?, एकमेकांवर टीका टिपण्णी करणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

अधिक वाचा  शेतकऱ्यांचा आसूड कडाडला, चिल्ला बॉर्डरवर 45 हजार शेतकरी एकवटले, संसदेकडे कूच करणार; 5 मागण्या कोणत्या?

नाट्यसंमेलन कसं असेल? (Natya Sammelan Schedule)
5 जानेवारी 2024 – पुण्यात शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ
6 जानेवारी 2024 – पिंपरी-चिंचवड येथे नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार
7 जानेवारी 2024 – विविध कार्यक्रमांचे आयोजन (महाराष्ट्रातील विविध शाखा व कलावंत सहभागी होणार)
महाराष्ट्रातील विविध ठिकाणी संमेलनाचे आयोजन

20 आणि 21 जानेवारी 2024 – अहमदनगर
27 आणि 28 जानेवारी 2024 – सोलापूर
4 फेब्रुवारी 2024 – बीड
10 आणि 11 फेब्रुवारी 2024 – लातूर
17 आणि 18 फेब्रुवारी 2024 – नागपूर, मुंबई