तळवडे येथील स्पार्कल कॅण्डल तयार करण्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत सहा महिलांचा होरपळून मृत्यू झाला. तर नऊ महिला व एक पुरुष कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना पुणे येथील ससून रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. तळवडेतील ज्योतिबानगर परिसरात शुक्रवारी (ता. ८) दुपारी तीन वाजता ही दुर्घटना घडली. हा प्रकार समजताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली जखमी आणि मृत महिलांना बाहेर काढले. महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.

गंभीर जखमींपैकी दोन महिला सुरूवातीलाच ससून रुग्णालयात पाठविल्या होत्या. उर्वरित सात गंभीर महिला व एका पुरुषावर पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात बर्न वॅार्ड नसल्याने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले.

अधिक वाचा  पिंक बॉल टेस्ट आधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, आपली चिंता मिटली, ऑस्ट्रेलियाच वाढलं टेन्शन

वायसीएमला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. खासदार श्रीरंग बारणे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, नामदेव ढाके, कार्तिक लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शहराध्यक्ष अजित गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शहराध्यक्ष तुषार कामठे, सुलक्षणा धर-शिलवंत आदींनी वायसीएमला भेट दिली.

स्पार्कल कॅण्डल बनविण्याच्या ज्वलनशील पदार्थाचा स्फोट झाल्याने जागेवरच सहा महिलांचा मृत्यू झाला. आग इतकी भयंकर होती की मृतांची ओळख पटणे मुश्किल झाले होते. राणा इंजिनिअरिंगच्या कंपाऊंडमध्ये एका छोट्या औद्योगिक शेडमध्ये हा छोटा कारखाना होता. रेडझोन असल्याने या भागात बहुतांश औद्योगिक शेड अनधिकृत आहेत. या दुर्दैवी घटनेला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.