राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे जोरदार हालचाली सुरु आहेत. नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरुन दोन मोठ्या भेटीगाठी आज घडून आल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची आज भेट घडून आली आहे. या भेटीत नवाब मलिक यांच्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रफुल्ल पटेल यांना आपल्या पत्राबाबत सांगितलं. आम्ही आमची भूमिका मांडली. तुम्ही पुढे ठरवा, असं फडणवीसांनी प्रफुल्ल पटेल यांना भेटीत सांगितल्याची माहिती सूत्रांना दिली आहे.

अधिक वाचा  शरद पवारांचा चक्रव्यूह, संभाव्य बंड ‘रणनिती’ ठरणारं; बैठकीतून कार्यकर्त्यांना विश्वास आणि गड राखण्यास अजित पवारच सरसावले

अजित पवारांकडून मलिकांना वेट अँड वॉचचा सल्ला

दुसरीकडे अजित पवार आणि नवाब मलिक यांचीदेखील भेट घडून आली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 15 मिनिटे चर्चा झाली. मलिकांवरुन सुरु असलेल्या वादावर यावेळी चर्चा झाली. अजित पवारांकडून मलिकांना वेट अँड वॉचचा सल्ला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे अजित पवार आणि नवाब मलिक यांची भेट झाली त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते.

प्रफुल्ल पटेलांनी फडणवीसांना काय सांगितलं?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल पटेल यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या पक्षाची भूमिका मांडली आहे. मलिकांनी अद्याप भूमिका जाहीर केलं नसल्याचं पटेल म्हणाले. मलिकांच्या भूमिकेआधी आम्ही भूमिका घेणं योग्य नसल्याचं पटेलांनी सांगितलं. आमदार म्हणून मलिकांना सभागृहात बसण्याचा अधिकार आहे, असंही पटेल यावेळी म्हणाले.

अधिक वाचा  अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार

विधानसभा अध्यक्षांनी तर मलिकांसाठी ही खुर्ची राखीव ठेवलेली?

“मलिकांना विधानसभा अध्यक्षांनी 49 नंबरची जागा दिलीय. पण विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या खुर्चीवर न बसता मलिक शेवटच्या बाकावर बसले. कारण अध्यक्षांच्या वतीने देण्यात आलेली खुर्ची ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागे होती. मात्र मलिकांनी आपली भूमिका जाहीर न केल्यामुळे ते त्या जागेवर बसलेच नाही. मलिकांनी आपली भूमिका घेतली असती तर आम्हीदेखील आमची भूमिका जाहीर केली असती”, असं पटेलांनी फडणवीसांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.