किरकटवाडी सिंहगड रस्त्याला लागून किरकटवाडी फाट्याजवळील शिवनगर येथे वीजेचा धक्का लागून मादी वानराचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. मृत झालेल्या आपल्या आईच्या कुशीत बसून वानराचे लहान पिलू जीवाच्या आकांताने ओरडत दोन्ही हातांनी आईला उठविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. हे दृष्य पाहून जमलेल्या नागरिकांच्या डोळ्यांत पाणी आले होते.

आंब्याच्या झाडाची वाळलेली फांदी मोडल्याने उंचावरून विजेच्या तारांवर पडल्याने वीजेचा धक्का लागून मादी वानराचा जागीच मृत्यू झाला. मादी वानराच्या पोटाला बिलगलेले पिलू उंचावरून खाली पडल्याने त्याच्या पोटाला झालेल्या जखमेतून रक्तस्राव सुरू होता. निपचित पडलेल्या आपल्या आईच्या कुशीत शिरून पिलू जोरजोराने ओरडत होते, दोन्ही हातांनी आईचे तोंड धरुन उठवण्याचा प्रयत्न करत होते परंतु काहीच उपयोग होत नव्हता.

अधिक वाचा  ‘माझा पक्ष, माझे वडिल’, अजित पवारांच्या मुलाने राष्ट्रवादीच्या कुठल्या आमदाराला थेट सुनावलं

आईच्या विरहाने व्याकूळ झालेल्या पिलाचा आकांत पाहून स्थानिक रहिवासी प्रविण दसवडकर, सौरभ कुलकर्णी, महेश पांडे यांनी वन विभागाला फोन करुन याबाबत माहिती दिली व पिलावर कुत्र्यांनी हल्ला करु नये म्हणून घटनास्थळी थांबून राहिले. वनपाल सचिन सपकाळ यांनी तातडीने बचाव पथक पाठविले परंतु तोपर्यंत जखमी पिलू सीडब्ल्युपीआरएस हद्दीत इतर वानरांकडे गेले होते.

सुसज्ज बचाव पथक गरजेचे

किरकटवाडी, खडकवासला, नांदोशी, धायरी व सिंहगड परिसरातील इतर गावांमध्ये सातत्याने वन्य प्राणी आढळून येत आहेत. तसेच अपघाताने प्राणी जखमी किंवा मृत्यू होण्याच्या घटनाही जास्त प्रमाणात घडत आहेत. वन विभागाशी संपर्क केल्यानंतर त्यांच्याकडून बचाव पथकाला माहिती देण्यात येते व त्यानंतर बचाव पथक दाखल होते.

अधिक वाचा  गृहमंत्रिपदामुळे शपथविधी रखडला? महायुतीत पडद्यामागे काय घडतंय? पाहा स्पेशल रिपोर्ट

यादरम्यान वेळ जात असल्याने जखमी प्राण्यांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा जीव जात आहे. त्यामुळे सिंहगड परिसरात कायमस्वरूपी सुसज्ज बचाव पथक असणे अत्यंत गरजेचे आहे.