ज्या मराठा समाजाला आरक्षण नाही असं म्हणता त्या मराठा समाजालाच आरक्षणाचा सर्वाधिक फायदा झाला असून मोदींनी दिलेल्या 10 टक्के आरक्षणामध्ये 85 टक्के जागा या मराठा समाजाला मिळाल्या असल्याचा थेट आरोप राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केला. केंद्रीय लोकसेवेच्या (UPSC) आएएसमध्ये 15.50 टक्के (Maratha In IAS Service) तर आयपीएसमध्ये 28 टक्के (Maratha In IPS Service) मराठा समाजाचे लोक असल्याची आकडेवारीही भुजबळांनी मांडली. हिंगोलीमध्ये ओबीसी एल्गाल महासभेत बोलताना छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर टीका करताना ही आकडेवारी समोर मांडली.
काय म्हणाले छगन भुजबळ?
राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, इतरांना दिलेल्या आरक्षणाचा सर्वाधिक फायदा हा मराठा समाजाला झाला आहे. मोदी सरकारने दहा टक्के आरक्षण (Maratha In EWS reservation) दिलं, पण त्यामध्ये 85 टक्के जागा या मराठा समाजाला मिळाल्या. उरलेल्या 40 टक्के जागांमध्ये मराठा समाजाला जागा मिळाल्या. आमच्या 27 टक्के आरक्षणामध्येही (Maratha In OBC) मराठा समाज आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण नसतानाही सर्वाधिक फायदा मिळतोय.
भुजबळांनी सांगितलेली आकडेवारी
ईडब्ल्यूएस (EWS Reservation) मध्ये 78 टक्के मराठा समाजाला आरक्षण मिळालं.
मराठा समाजाला लोकसेवा आयोगातील प्रतिनिधित्व (Maratha in UPSC Service)
ए ग्रेड – 33.50 टक्के
बी ग्रेड – 29 टक्के
सी ग्रेड – 37 टक्के
डी ग्रेड – 36 टक्के
IAS – 15.50 टक्के
IPS – 28 टक्के
IFS – 18 टक्के
मंत्रालय कॅडरमध्ये
ए ग्रेड – 37.50
बी ग्रेड – 52.30
सी ग्रेड – 52
डी ग्रेड – 55.50 टक्के
गेल्या वर्षभरात झालेल्या 650 नियुक्त्यांपैकी 85 टक्के नियुक्त्या या मराठा समाजाला मिळाल्या आहेत असं छगन भुजबळानी सांगितलं.
मराठा समाजाला आर्थिक मदतही मिळाली
मराठा समाजाला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ओबीसींपेक्षा जास्त फायदा झाल्याचं छगन भुजबळ म्हणाले. ते म्हणाले की, मराठा समाजामध्ये गरीब आहेत, आमचा त्यांना विरोध नाही, पण त्यांना आताही आरक्षणाचा लाभ मिळतोय. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून 70 हजार लाभार्थ्यांना 5160 कोटी रुपये देण्यात आले. ओबीसींना अद्यापही तेवढे देण्यात आले नाहीत. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती, पंजाबराव देशमुख महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाला 10,500 कोटी रुपये देण्यात आले आहेत.