ड्रग्जमाफिया ललित पाटील याच्या पोलिस कोठडीत पुणे न्यायालयाने २४ नोव्हेंबरपर्यंत चार दिवसांच्या पोलिस कोठडीत वाढ केली आहे. ललितच्या कोठडीत वाढ झाल्याने त्याचा ताबा घेण्यासाठी तयारीत असलेल्या नाशिक पोलिसांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

शिंदेगाव येथील एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्जच्या कारखान्याशी भूषण पाटील याचा संबंध आहे. भूषण हा ललित पाटीलचा भाऊ असल्याने त्याचाही या कारखान्याशी संबंध असण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी नाशिक पोलिसांना ललित पाटील याचा चौकशीसाठी ताबा आवश्यक आहे. मात्र मुंबई पोलिसांकडून दोन आठवड्यांपूर्वी ललितचा ताबा पुणे पोलिसांनी घेतला आहे.

अधिक वाचा  चक्रीवादळामुळे रद्द झालेली इंडिया आघाडीच्या बैठकीची तारीख ठरली आता 7 डिसेंबरला होणार बैठक

त्यानंतर पाटील याच्याशी संबंधित असलेल्या संशयितांना पुणे पोलिसांनी अटक करून मोक्कान्वये कारवाई केली आहे. ललित पाटील याच्या पोलिस कोठडीची सोमवारी (ता. २०) मुदत संपली. त्यामुळे त्यास सोमवारी पुणे न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी अजूनही ललित पाटील याची चौकशी सुरू असल्याचे सांगत पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानुसार पाटीलच्या कोठडीत वाढ करण्यात आली.

नाशिक पोलिसांनी ललितसह भूषण पाटील या दोघांचा चौकशीसाठी ताबा आवश्यक आहे. त्यासाठी नाशिक शहर गुन्हेशाखेने प्रस्तावही तयार केला आहे. न्यायालयाने ललितला न्यायलयीन कोठडी सुनावल्यास नाशिक पोलिस त्याचा ताबा घेण्यासाठी न्यायालयाकडे मागणी करणार होते. परंतु ललितला पुन्हा कोठडी मिळाल्याने आता आणखी काही दिवस नाशिक पोलिसांना ललितचा ताबा घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

अधिक वाचा  भाजपा विजय ही चार कारणं, काँग्रेसनेही यापुढे हे केलं पाहिजे: प्रशांत किशोर यांच निकालाचं विश्लेषण

गेल्या महिन्यात मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी शिंदेगावातील एमडीचा कारखाना उद्ध्वस्त करीत सुमारे ३०० कोटींचा ड्रग्जचा साठा जप्त केला होता. त्यापाठोपाठ नाशिक पोलिसांनी शिंदेगावात दुसरा ड्रग्जचा कारखाना उद्‌ध्वस्त करीत सहा कोटींचा ड्रग्जचा साठा जप्त केला. या दोन्ही कारखान्यांशी भूषण पाटील याचा संबंध आहे. त्यामुळे या ड्रग्ज व्यवसायाशी ललित पाटील याचाही संबंध असण्याची शक्यता असल्याने त्यासंदर्भात चौकशीसाठी पोलिसांना त्यास ताब्यात घेण्याची आवश्यकता आहे.