धनगर समाजाचा एसटीत समावेश करावा आणि समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी राज्यभरात धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे. राज्यातील अनेक भागात जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन सुरू आहे. जालन्यातही धनगर समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला होता. यावेळी आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागलं आहे. मोर्चेकऱ्यांनी अचानक जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केली असून वाहनांच्या काचाही फोडल्या आहेत. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
धनगर समाजाने आरक्षणाच्य मागणीसाठी जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. सुरुवातीला हा मोर्चा शांततेत निघाला. पण जस जसं जिल्हाधिकारी कार्यालय जवळ आलं तसे कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर अचानक जमावाने तोडफोड सुरू केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच वाहनेही फोडण्यात आली. त्यामुळ एकच गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांना पांगवण्यास सुरुवात केली आहे. मोर्चाला अचानक हिंसक वळण लागल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
कार्यकर्ते गेटवर चढले
धनगर समाजाचे कार्यकर्ते हातात पिवळे झेंडे घेऊन आले होते. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयावर अडवण्यात आले. त्यामुळे संतप्त कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर चढून आत शिरले. आत शिरताच कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फोडल्या. खुर्च्या उचलून फेकल्या. वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे एकच तणाव निर्माण झाला होता. मोठ्या संख्येने हे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले होते.
सांगलीत निवेदन
दरम्यान, सांगलीतही धनगर समाजाने आपल्या एसटी आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. धनगर समाजाने शांततेत मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. राज्यात धनगर समाजाला एसटी चे आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमदार गोपीचंद पाडळकर यांच्या नेतृत्वात आंदोलने सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा स्वरूपात जाऊन आरक्षण मागणीसाठी निवेदन सादर करण्याचे आवाहन पाडळकर यानी केले होते. यानुसार आज सांगलीत धनगर समाजाने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढीत आपल्या आरक्षण मागणीसाठी निवेदन सादर केले.
पाण्यात आंदोलन
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी लोणंद नगरपंचायतीसमोर गणेश केसकर गेल्या सहा दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. आरक्षणाच्या मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी निरा नदीच्या पात्रामध्ये सर्व आंदोलकांनी पाण्यात उतरून हे आंदोलन केले. धनगर आरक्षणाबाबत धनगडचे धनगर असे दुरुस्तीचे शिफारस पत्र राज्यपालांनी दोन दिवसांमध्ये द्यावे, अशी मागणी शासनापर्यत पोहचविण्याचे आश्वासन खंडाळ्याचे तहसीलदार अजित पाटील यांनी दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
इंदापूरमध्येही मोर्चा
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आवाहनानुसार आज धनगर समाज बांधवांकडून इंदापूर तहसील कार्यालयास लेखी निवेदन देण्यात आले आहे. राज्य सरकारने तात्काळ धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.