महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द अत्यंत महत्वाचा असतो आणि आज भंडाऱ्यात त्याचीच प्रचिती आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरसभेत केलेली मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मान्य केली. त्यामुळे महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द महत्त्वाचा असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री भंडाऱ्यात होते. यावेळी फडणवीस यांनी आपल्या भाषणात विविध मु्द्यांवर भाष्य केले. आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मुख्यमंत्री आज भंडारा जिल्ह्यात आले असून भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची सरकारकडून धनाला हमी भावासह बोनस देण्याची मागणी असल्याचे सूतोवाच केले. सोबतच फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना मागील वर्षी सारखाच बोनस जाहीर करावा अशी आपली ही मागणी असल्याचे म्हटले.

अधिक वाचा  महापालिका प्रशासनाला सर्वच लोकप्रतिनिधींची निवेदने करोडो निधी तरीही ‘पाणीबाणी’च ; ही कारणे अन् उपाय

फडणवीस यांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. त्यावेळी त्यांनी धानाला बोनस देण्याची मागणी करणारे फडणवीस तर अर्थ मंत्री म्हणून त्याची पूर्तता करणारे अजित पवारही या ठिकाणी उपस्थित असल्याचे सांगितले. धानाला बोनस देताना कोणतीही अडचण होणार नाही असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

काही दिवसानंतर सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आम्ही धानाला बोनस जाहीर करू अशी घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. त्यामुळे फडणवीस यांनी मागणी करतात लगेच मुख्यमंत्र्यांनी त्यासंदर्भात निर्णय दिल्याचे आज भंडारामध्ये सर्वांना पाहायला मिळाले. या मुद्यावरून फडणवीस हेच महायुती सरकारमध्ये ‘बॉस’ असल्याची चर्चा सुरू झाली आहे.