अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्यासह १४ साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त आयुक्त रितेश कुमार यांनी दिले.

अमली पदार्थ विक्री प्रकरणात ललित अनिल पाटील (वय ३७, रा. अक्षरधारा सोसायटी, मातोश्रीनगर, नाशिक), अरविंदकुमार प्रकाशचंद्र लोहरे (वय ३९, रा. ओशिवरा, मुंबई, मूळ रा. उत्तरप्रदेश), अमित जानकी साह ऊर्फ सुभाष जानकी मंडल (वय २९, रा. देहू रस्ता, जि. पुणे), रौफ रहीम शेख (वय १९, रा. ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशनजवळ), भूषण अनिल पाटील (वय ३४, रा. मातोश्रीनगर, नाशिक), अभिषेक विलास बलकवडे (वय ३१, रा. विजय ॲनेक्स, नाशिक), रेहान ऊर्फ गोलू आलम सुलतान अहमद अन्सारी (वय २६, रा. धारावी, मूळ रा. अयोध्या), प्रज्ञा अरुण कांबळे ऊर्फ प्रज्ञा अरुण माहिरे (वय ३९ रा. विंग स्पेसेस सोसायटी, नाशिक), झिशान इक्बाल शेख (वय ३३, रा. फ्रेंड्स कॉलनी, नाशिक), शिवाजी अंबादास शिंदे (वय ४०, रा. एकतानगर, नाशिक), राहुल पंडित ऊर्फ रोहितकुमार चौधरी (वय ३०, रा. विरार, मूळ रा. बिहार) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच या गुन्ह्यात समाधान बाबाजी कांबळे (रा. नांदूर, नाशिक), इम्रान शेख ऊर्फ आमीर खान (रा. धारावी, मुंबई), हरिश्चंद्र उरवादत्त पंत (वय २९, रा. बोईसर, मुंबई) अद्याप फरार आहेत. या सर्व आरोपींविरुद्ध मोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

अधिक वाचा  नागपुरात उद्यापासून विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन; आज संध्याकाळी चहापानाचा कार्यक्रम, विरोधक हजर राहणार?

पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या परिसरातून दोन कोटी १४ लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले होते. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ललित दोन ऑक्टोबरला ससून रुग्णालयातून पसार झाला होता. त्याला मुंबई पोलिसांनी चेन्नई परिसरातून अटक केली होती. ललित आणि लोहरेने गेल्या १० वर्षांत अमली पदार्थ तस्करीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुनील तांबे यांनी पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्यामार्फत अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे या टोळीविरुद्ध मोका कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता. पोलिस आयुक्त रितेश कुमार आणि पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रस्तावाची पडताळणी केली. त्यानंतर ललितसह साथीदारांविरुद्ध मोका कारवाईचे आदेश दिले.