बीड : मराठा आरक्षणासाठी शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी दगडफेक, जाळपोळीमुळे हिंसक वळण मिळाले. यात आतापर्यंत २३ गंभीर गुन्ह्यांसह ५९ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये जिल्हाभरात ११९ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. याच दंगा करणाऱ्यांमध्ये शाळकरी, महाविद्यालयीन मुलांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत बीडमध्ये चार, तर जिल्ह्यात सात जणांना ताब्यात घेतले आहे.

बीड शहरात सोमवारी झालेल्या जाळपोळ, दगडफेकीमध्ये जास्त प्रमाणात मुलांचाच समावेश होता. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्येही २५ वर्षे वयाच्या आतील मुलांचाच जास्त समावेश आहे. या मुलांनी आक्रमक होत सोमवारी दगडफेक करून नुकसान केले होते; तसेच माजी मंत्री, आमदारांच्या घरांसह राजकीय नेत्यांची कार्यालये पेटविली होती. यामुळे जिल्हाभरात आतापर्यंत गंभीर स्वरूपाचे २३ गुन्हे दाखल झाले आहेत. यातील आरोपींचा पोलिसांनी शोध घेणे सुरू केले आहे. यात काही अल्पवयीन मुलांचाही सहभाग आढळला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी आतापर्यंत चार मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांना बालन्यायालयासमोरही हजर केल्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल गुरले यांनी सांगितले. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  निर्णय थेट…अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार नाहीच, अनेकांचे स्वप्न भंगलं

११९ पकडले, आणखी १५० रडारवर

पोलिसांनी आतापर्यंत २३ ठिकाणी ३०७ सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत दाखल गुन्ह्यांची संख्या ५९ वर गेली आहे; तसेच यात ११९ जणांना बेड्या ठोकल्या आहेत; तसेच आणखी १५० जणांची ओळख पटली असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू आहे.

अशी आहे आकडेवारी

एकूण ५९ गुन्हे – (जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन, जाळपोळ, जिवे मारण्याचा प्रयत्न, हल्ला, दगडफेक, दंगा करणे, घडवून आणणे, रस्ता अडविणे, विनापरवानगी आंदोलन करणे आदी.)

गंभीर गुन्हे – २३

एकूण अटक आरोपी – ११९

अधिक वाचा  विराट कोहलीसाठी मोहम्मद शमी उभा राहिला, सरळ बोलला की….

सीआरपीसी ६८, ६९ ची नोटीस (तात्पुरते स्थानबद्ध) – ९३३

१०७ ची नोटीस (प्रतिबंधात्मक कारवाई) – ३४६

सीआरपीसी ४१ ची नोटीस (सात वर्षांच्या आत शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यात पकडून सोडणे) – ७६

१४९ ची नोटीस (गुन्हा करू नये म्हणून) – ७६१

अल्पवयीन आरोपी – ७

प्रतिबंधात्मक कारवायांवरही भर

पोलिसांकडून गुन्ह्यांत सहभाग असणाऱ्यांना तर अटक केलीच जात आहे; परंतु इतर लोकांवरही प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत. आतापर्यंत एक हजारांपेक्षा जास्त लोकांना नोटीस देण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्याकडूनही काही कारवाया केल्या जात आहेत.

अधिक वाचा  प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरांच्या वडिलांचे कारनामे समोर; पुणे कोल्हापूर सातारा मुंबई निलंबन अन् लाखोंची..

माजलगावनंतर बीडमध्ये पथसंचलन

सोमवारी माजलगाव आणि बीड शहरातच जास्त तणाव निर्माण झाला होता. यासाठी रॅपिड ॲक्शन फोर्ससह इतर पोलिसांचा फौजफाटा घेऊन बुधवारी माजलगावात पथसंचलन करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास बीड शहरातही विशेष पथकांना सोबत घेऊन पथसंचलन करण्यात आले.

दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई

जिल्ह्यात आतापर्यंत २३ गंभीरसह एकूण ५९ गुन्हे दाखल झाले आहेत, तसेच ११९ आरोपींना अटक केली असून, आणखी १५० जणांची ओळख पटविली आहे. त्यांनाही अटक केली जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी स्वतंत्र बंदोबस्त असेल. जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. तसेच आम्ही दगडफेक, जाळपोळ झालेल्या ठिकाणांची पाहणी केली आहे.

–  ठाकूर, पोलिस अधीक्षक, बीड