नागपूर – मराठा आंदोलकांकडून नेत्यांची घरे लक्ष्य करण्यात येत आहेत. त्यांच्या घरावर हल्ले करून जाळपोळ होत असताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यासह आमदारांच्या सुरक्षेत वाढ करीत घरासमोरही सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

मराठवाड्यात आमदारांच्या घरांवर हल्ले करण्यात आले. उपराजधानीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदींसह आमदारांच्या घरावर असा कुठलाही प्रकार घडू नये यासाठी पोलिस आयुक्तांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांच्या घराच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

अधिक वाचा  सातारा रस्त्यावर चव्हाणनगरजवळ कोयत्याने हल्ला; एकाची प्रकृती चिंताजनक

देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय देवगिरी, रामगिरी आणि इतर महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांच्याही सुरक्षेत वाढ केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

संघ मुख्यालयाच्या सुरक्षेत वाढ

केरळमधील बॉम्बस्फोट आणि मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली असल्याची माहिती आहे. संघ मुख्यालय हे नेहमीच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांनी विशेष काळजी म्हणून सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे.